नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनाला महिना उलटून गेला असून अद्याप तोडगा निघालेला नाही. दरम्यान, आज आंदोलक आणि सरकारमध्ये पुन्हा चर्चा होणार आहे. मात्र, तिन्ही केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम आहेत. त्यासोबतच किमान आधारभूत किमतीचे आश्वासन शेतकऱ्यांना हवे आहे. २६ नोव्हेंबरपासून दिल्लीतील, सिंघू आणि टीकरी सीमेवर शेतकऱ्यांनी मुक्काम ठोकला असून सहा महिने तेथेच आंदोलन करण्याची तयारी ठेवली आहे.
चर्चेची सहावी फेरी -
तीन आठवड्यानंतर शेतकऱ्यांसोबत चर्चेची सहावी फेरी होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि पियूष गोयल यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांसोबतच्या चर्चेत सरकारची भूमिका काय असेल, यावर केंद्रीय मंत्र्यांनी चर्चा केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. किमान आधारभूत किमती रद्द करण्याचा सरकारचा हेतू नाही, असे आश्वासन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल दिले.
आम्ही संघर्ष करत राहणार -
'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांच्याशी संवाद साधला. यावेळी राकेश टिकैत यांनी 32 वर्षांपूर्वीच्या आपल्या वडिलांसोबत केलेल्या आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला. वडिलांसोबत 32 वर्षांपूर्वी दिल्लीला आलो होतो. ते आंदोलन दिल्लीच्या आतील भागात होते आणि आताचे आंदोलन आम्ही सीमेवर करत आहोत. तेव्हा शेतकऱ्यांच्या मागण्यापुढे सरकार झुकले होते आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांवर विश्वास ठेवला. पण आजचे सरकार त्रास देत आहे. आम्ही संघर्ष करत राहणार आहोत. बुधवारी होणाऱ्या चर्चेत आम्ही आमचे मुद्दे मांडू, असे ते म्हणाले.