वडोदरा (गुजरात) - लोक दिवाळी साजरी करत फटाके फोडत होते. याठिकाणी अचानक मारहाण आणि तोडफोड सुरू झाली. दिवाळीचे रॉकेट पडल्याने शेजारी उभ्या असलेल्या मोटारसायकलला आग लागल्याची घटना सोमवारी रात्री घडली. यानंतर सुमारे 400 ते 500 लोक जमा झाले आणि त्यांनी दगडफेक सुरू केली. नंतर हे प्रकरण इतके वाढले की अनेक वाहनांना आग लावण्यात आली, अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली आणि पथदिवे बंद करण्यात आले. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे १९ जणांना ताब्यात घेतले आहे.
माहिती मिळताच वडोदरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची पाहणी केली. पाहणीदरम्यान पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. व्हिडिओमध्ये, हल्लेखोर पेट्रोल बॉम्ब फेकताना आणि पोलिसांच्या वाहनांवर हल्ला करताना दिसत आहेत. मात्र, नंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे १९ जणांना ताब्यात घेतले. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा परिसर अतिशय संवेदनशील असून, गेल्या चार महिन्यांत या भागात दंगलीच्या तीन घटना घडल्या आहेत.
वडोदरा पोलिसांनी हे प्रकरण आता गुन्हे शाखेकडे सोपवले असून सविस्तर तपास सुरू केला आहे. याशिवाय फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पोहोचून कोणत्या प्रकारची स्फोटके आणि साहित्य वापरण्यात आले होते, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
डीसीपी यशपाल जगनिया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "काल रात्री पाणीगेट येथील मुस्लिम मेडिकल सेंटरजवळ दगडफेकीची घटना घडली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आवश्यक ती कारवाई केली. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. सीसीटीव्ही तपासण्यात आले आहेत. आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू आहे. हे प्रकरण आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.