मुंबई - पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला याची रविवारी (दि. 30 मे)रोजी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यावर राज्यात मोठ्या प्रमाणात राजकारण तापले आहे. मान सरकारने सुरक्षा काढून घेतल्याच्या दुसऱ्या दिवसीच सिद्धू मूसेवाला याची हत्या झाल्याने सरकारवर मोठ्या प्रमाणात आरोप होत आहेत. दरम्यानस, सिद्धू याच्या हत्येच्या काही मिनिटांपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये दोन गाड्या मुसेवाला यांच्या कारचा पाठलाग करताना दिसत आहेत. मात्र, राज्य पोलिसांनी अद्याप या व्हिडिओला दुजोरा दिलेला नाही.
कॅनडातल्या गँगस्टर गोल्डी ब्रारने स्वीकारली जबाबदारी - सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिद्धू मूसेवाला यांची काळी एसयूव्ही इतर अनेक वाहनांसह व्यस्त असलेल्या रस्त्यावरून जाताना दिसत आहे. या ठिकाणाहून काही मिनिटांनी पुढे हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये, दोन्ही वाहने घटनेपूर्वी मुसेवाला यांच्या काळ्या एसयूव्हीच्या मागे जाताना दिसत आहेत. यानंतर पांढऱ्या रंगाची बुलेरोही मागून वेगाने जाताना दिसत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पंजाब पोलिसांशिवाय हरियाणा आणि इतर राज्यांच्या पोलिसांनाही सतर्क करण्यात आले आहे. पोलीस पथक दोन्ही वाहनांचा शोध घेत आहे. सीमावर्ती भागात वाहनांची तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, सशस्त्र आरोपी हरियाणातील नोंदणीकृत क्रमांकाची अल्टो कार हिसकावून पळून गेले. त्यामुळे इतर सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.
दुसरीकडे पंजाबचे पोलीस महासंचालक व्हीके भावरा यांनी सांगितले की, मूसवाला यांची हत्या टोळ्यांमधील परस्पर वैरामुळे झाल्याचे दिसते आणि त्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग होता. रविवारी संध्याकाळी झालेल्या हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी अकाली नेता विकी मिद्दुखेडा यांच्या हत्येप्रकरणी मूसवाला यांचे व्यवस्थापक शगुनप्रीतचे नाव समोर आले होते, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा मृत्यू झाल्याचा ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेचा दावा