नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) 10वी आणि 12वीच्या परीक्षा अनुक्रमे 17 आणि 16 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. कोरोनामुळे बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाईल. पहिल्या टर्मची परीक्षा नोव्हेंबर- डिसेंबर आणि दुसरी टर्म मार्च-एप्रिलमध्ये घेतली जाईल. त्याचबरोबर नोव्हेंबरमध्ये होणारी परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असेल. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ९० मिनिटे मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी सीबीएसईकडून नमुना ओएमआर शीट जारी करण्यात आली आहे.
नोव्हेंबरमध्ये होणारी बोर्डाची परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असेल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पद्धत माहिती व्हावी यासाठी बोर्डाने नमुना ओएमआर शीट जारी केली आहे. ही ओएमआर शीट भरण्यासाठी विद्यार्थ्यांना फक्त निळ्या किंवा काळ्या पेनचा वापर करावा लागेल, असे बोर्डाच्या अधिसूचनेत म्हटले आहे. ओएमआर शीटमध्ये विद्यार्थ्यांना पेन्सिल वापरता येणार नाही, कोणताही विद्यार्थी पेन्सिल वापरताना आढळून आल्यास विद्यार्थ्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
अशी भरा ओएमआर शीट
जारी केलेल्या नमुना OMR शीटमध्ये 60 प्रश्न देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी निळ्या किंवा काळ्या पेनने बॉक्समध्ये प्रत्येक प्रश्नाचा योग्य पर्याय लिहायचा आहे. चौकटीत लिहिलेले उत्तर अंतिम उत्तर मानले जाईल. याशिवाय विद्यार्थ्याने चौकटीत उत्तर लिहिले असेल आणि वर्तुळ गडद केले नसेल, तर प्रतिसाद चौकटीत लिहिलेले उत्तर ग्राह्य अंतिम मानले जाणार नाही. परंतु विद्यार्थ्याने तिन्ही कॉलम रिकामे सोडले तो प्रश्न मानला जाणार नाही. सीबीएसईने शाळांना दिलेल्या वेळापत्रक आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार ओएमआर शीट डाउनलोड करण्यास सांगितले आहे. तसेच, सीबीएसईने केंद्र अधीक्षकांना ओएमआर शीट सुरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा - ...म्हणून पंतप्रधान झालो नाही- भगतसिंह कोश्यारी यांची मिश्किल टिप्पणी
सीबीएसईने जारी केल्या सूचना
याशिवाय CBSE ने शाळांना 23 डिसेंबरपर्यंत प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन त्यांचे गुण अपलोड करण्यास सांगितले आहे. CBSE ने शाळांना 23 डिसेंबरपर्यंत प्रात्यक्षिक आणि अंतर्गत परीक्षेचे गुण अपलोड करून घेण्यास सांगितले आहे. निर्धारित वेळेत कोणतीही शाळा प्रात्यक्षिक परीक्षा घेऊ शकली नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सीबीएसईने म्हटले आहे. यासोबतच शाळेवर 50 हजार रुपयांपर्यंतचा दंड आणि मान्यतेवरही कारवाई होऊ शकते. एका टर्मच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी कोणत्याही बाह्य परीक्षकाची नियुक्ती केली जाणार नाही.
हिवाळ्यामुळे परिक्षेच्या वेळात बदल
CBSE ने या वर्षी 10वी आणि 12वीच्या विषयांना एकत्र करून 189 विषयांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात 10वीचे 75 विषय आणि 12वीच्या 114 विषयांचा समावेश आहे. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असेल. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ९० मिनिटे देण्यात येणार आहेत. बोर्डाने परीक्षेच्या वेळेतही बदल केला आहे. परीक्षा सकाळी 10.30 ऐवजी 11.30 वाजता सुरू होईल. हिवाळा असल्याने परीक्षेच्या वेळेत बदल करण्यात आला. याशिवाय विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १५ मिनिटांऐवजी २० मिनिटे मिळणार आहेत. त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ९० मिनिटांव्यतिरिक्त ३० मिनिटे मिळणार आहेत.
हेही वाचा - मुकेश अंबानी कुठेही स्थलांतर करणार नाही; रिलायन्स इंडस्ट्रीजचे स्पष्टीकरण