नवी दिल्ली : दहावी आणि बारावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परिक्षांचे वेळापत्रक ३१ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी याबाबत शनिवारी माहिती दिली. २०२१मध्ये होणाऱ्या या परीक्षांचे वेळापत्रक मी यादिवशी जाहीर करेल असे त्यांनी सांगितले.
फेब्रुवारीमध्ये नाहीत होणार परीक्षा..
दरवर्षी दहावी आणि बारावीच्या केंद्रीय माध्यमिक बोर्डाच्या परीक्षा (सीबीएसई) या फेब्रुवारीमध्ये सुरू होतात. मात्र, २०२१मधील बोर्ड परीक्षा फेब्रुवारीमध्ये होतील असा कोणताही प्रस्ताव अद्याप मांडण्यात आला नाही. यासोबतच, बोर्ड परीक्षांशी संबंधित कामकाजालाही अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी मंगळवारी याबाबत घोषणा केली होती.
सराव परीक्षा सुरू..
बोर्डाची परीक्षा कधी होणार याबाबत काहीही स्पष्टता नसल्यामुळे देशभरातील कित्येक शाळांनी ऑनलाईनच सराव परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर शाळांना सराव परीक्षा, प्रात्यक्षिके आणि इतर गोष्टींचे नियोजनही करता येणार आहे.
बोर्डाची परीक्षा ऑनलाईन नाही..
२०२१मधील सीबीएसई परीक्षा ऑनलाईन होईल का याबाबत विचारले असता, तसा काही विचार नसल्याचे पोखरियाल यांनी स्पष्ट केले. बोर्डाची परीक्षा ही नेहमीप्रमाणे पेन आणि कागदाचा वापर करुनच द्यावी लागणार आहे.
हेही वाचा : ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचे प्रशासनापुढे आव्हान