गया (बिहार): बिहारच्या गयामध्ये सैन्य अभ्यासादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. होळीच्या रंगात तल्लीन झालेल्या गुलरबेड गावातील एका घरावर लष्करी सराव सुरू असताना अचानक तोफगोळा पडला. तोफेचा गोळा घरात पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच सैन्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
अनेकदा पडताहेत तोफेचे गोळे: होळीच्या दिवशी बुधवारी सकाळी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गयाच्या डोभी ब्लॉकच्या त्रिलोकीपूरमध्ये लष्कराची सराव फायरिंग रेंज चालते. शेजारील गावांना या फायरिंग रेंजचा फटका बसतो आणि अनेकदा तोफांचे गोळे फायरिंग रेंजच्या बाहेर पडतात. गयाच्या बाराछत्ती पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या गुलरवेद गावात बुधवारी फायरिंग रेंजचा शेल पडला आणि दुर्घटना घडली.
एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू: मिळालेल्या माहितीनुसार, मांझी यांच्या घरावर लष्करी सराव गोळीबाराचा शेल पडला होता. या घटनेत त्यांची मुलगी आणि जावयासह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जणांची प्रकृती गंभीर असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. कांचन कुमारी, गोविंदा मांझी, सूरज कुमार यांचा मृतांमध्ये समावेश आहे. जखमींमध्ये गीता कुमारी, पिंटू मांझी, रासो देवी यांचा समावेश आहे. या सर्वांना उत्तम उपचारासाठी मगध मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले आहे.
होळी खेळत असताना ही घटना घडली: मिळालेल्या माहितीनुसार, गोला मांझी यांचे कुटुंबीय होळी खेळत होते. दरम्यान, अचानक लष्करी सरावाचा एक तोफगोळा घरात पडला आणि होळीच्या आनंदाचे रूपांतर दुःखद वातावरणात झाले अन् तीन जणांचा मृत्यू झाला. तीन गंभीर जखमी असून, जीवन-मरणाची लढाई लढत आहेत.
माहितीनंतर अधिकारी गुलारबेड गावाकडे रवाना झाले आहेत.घटनेची कारणे व इतर मुद्यांवर तपास केल्यानंतरच काही स्पष्टपणे सांगता येईल. किती लोकांचा मृत्यू झाला, हे घटनास्थळी पोहोचल्यानंतर टीमने दिलेल्या माहितीनंतरच सांगता येईल. पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे.- आशिष भारती, एसएसपी गया
हेही वाचा: भाजपच्या नेत्यांनाच घेतले पैसे देऊन विकत, प्रदेशाध्यक्षांनी केला आरोप