नवी दिल्ली - कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे गेल्या दोन महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. 26 जानेवारी रोजी होणार्या मसाठी शेतकऱ्यांनी तयारी पूर्ण केली आहे. सीमेवर शेतकरी मोठ्या संख्येने ट्रॅक्टर-ट्रॉलीसह पोहोचत आहेत. दरम्यान राजस्थानमधील उंट सुद्धा टिकरी आणि धनसा सीमेवर पोहोचले आहेत. राजस्थानमधील उंटही रॅलीमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहेत.
सरकार पुढील बैठकीची तारीख ठरविण्याच्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. सरकारला जेव्हा अपयश येते. तेव्हा त्यांनी याचा दोष दुसऱ्यांच्यावर ठेवला आहे. सरकारने 26 जानेवारी रोजी हे कायदे रद्द करण्याची घोषणा करावी, असे शेतकरी नेते जसबीरसिंग गिल म्हणाले
जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्याविरूद्ध दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. सरकार आणि शेतकरी यांच्यात आतापर्यंत 11 फेऱ्या झाल्या आहेत. परंतु अद्याप तोडगा निघालेला नाही. सरकार किंवा शेतकरी दोघेही माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. दरम्यान, 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेडची तयारी सुरू केली आहे. केवळ पुरुषच नाही तर स्त्रिया देखील घरोघरी जाऊन लोकांना या चळवळीत सहभागी होण्यासाठी आवाहन करीत आहेत.
कृषी कायद्यांवर शेतकऱ्यांची भूमिका -
दोन वर्ष कायदे स्थगीत करण्याचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी नाकारला आहे. कृषी कायदे मागे घ्यावे, ही मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. शेतकरी आंदोलन शांततेत सुरुच राहणार असल्याचेही शेतकरी नेत्यांनी सांगितले.