नवी दिल्ली - केंद्र सरकारचे कर्मचारीद दिवाळीपूर्वी दिवाळीचा अनुभव घेणार आहेत. कारण केंद्र सरकारने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) 17 टक्क्यांवरून 28 टक्के करण्याला मंजुरी दिली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Union Minister Anurag Thakur) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
महागाई भत्ता वाढण्याचा फायदा 48.34 लाख केंद्रीय कर्मचारी व 65.26 लाख पेन्शनर्सला मिळणार आहे. वाढीव महागाई भत्ता हा 1 जुलै 2021 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान, वाढीव महागाई भत्त्याने केंद्र सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त 34 हजार कोटी रुपयांचा बोझा पडणार आहे.
हेही वाचा-DA hike केंद्राच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी; महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ!
मागील वर्षात दिला नव्हता वाढीव महागाई भत्ता
केंद्रीय वित्त मंत्रालयाने केंद्र सरकारच्या 50 लाख कर्मचाऱ्यांना 1जानेवारी 2020 ते जुलै 2021 पर्यंत वाढीव महागाईभत्ता न देण्याचा निर्णय घेतला होता. 61 लाख निवृत्तीवेतन धारकांनाही वाढीव महागाई भत्ता न देण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाच्या संकटाचा विचार करता अतिरिक्त महागाई भत्त्याचा हप्ता (डिअनेस रिलिफ) आणि वाढीव महागाई भत्ता (डिअरनेस अलाउन्स) हा 1 जानेवारी 2020 पासून देण्यात येणार नसल्याचे केंद्रीय वित्तव्यय विभागाने म्हटले होते. सूत्राच्या माहितीनुसार वाढीव महागाई भत्ता व अतिरिक्त महागाई न दिल्याने केंद्र सरकारचे मागील वर्षात 37 हजार 530 कोटी रुपये वाचणार आहेत. केंद्र सरकारने ऑक्टोबरमध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ केल्याने 17 टक्के महागाई भत्ता झाला होता. या निर्णयाची मागील आर्थिक वर्षाच्या 1जुलैपासून अंमलबजावणी करण्यात येणार होती. मात्र, कोरोनामुळे हा निर्णय थांबविला होता.
हेही वाचा-प्रशांत किशोर-सोनिया गांधी भेट; पवारांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीवर चर्चा नाही