अयोध्या (उत्तर प्रदेश) : रस्ते अपघातांची मालिका महामार्गावर थांबताना दिसत नाही. लखनौ गोरखपूर महामार्गावरील अयोध्या कोतवाली भागात शुक्रवारी प्रवासी बस ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातात किमान सात प्रवासी ठार तर 40 हून अधिक जखमी झाले. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येहून येणारी खासगी बस आंबेडकरनगरकडे जाण्यासाठी महामार्गावर वळण घेत असताना विरुद्ध बाजूने येणाऱ्या ट्रकला धडकली. ही धडक एवढी वेगवान होती की दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यातच बसमध्ये बसलेल्या अनेकांना मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या.
अपघाताची धडक एवढी भीषण होती की, ट्रक पलटी होऊन बस त्याखाली दबला गेला. अयोध्येचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय राजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. बचावकार्य अजूनही सुरूच आहे, असे त्यांनी सांगितले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचार देण्याकरता नेण्यात आले. तसेच गंभीर जखमी झालेल्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले आहेत. प्राणहानी टाळण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
जिल्हा दंडाधिकारी नितीश कुमार यांनी वृत्तसंस्थाना सांगितले की, जखमींना उपचारासाठी डझनहून अधिक रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. कुमार म्हणाले की, जिल्हा अधिकारी अजूनही अपघातग्रस्त वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढत आहेत.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवरून दुःख व्यक्त केले. जखमींना रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. मुख्यमंत्रायंनी अयोध्या जिल्ह्यातील रस्ता अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी कामना करत मुख्यमंत्र्यांनी शोकग्रस्त कुटुंबियांप्रती दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना जखमींची पूर्ण व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनाने जखमींना तात्काळ रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करावेत आणि मदतकार्याला गती द्यावी. तसेच जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी आशाही मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करून व्यक्त केली आहे.