वाराणसी: उत्तर प्रदेशातील घोसी लोकसभेचे बसप खासदार अतुल राय यांची तीन वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. या संदर्भात वाराणसीच्या खासदार-आमदार न्यायालयाने शनिवारी निकाल दिला. खासदार अतुल राय यांचे वकील अनुज यादव म्हणाले की, न्यायालयाने आमच्या अशिलाला निर्दोष मुक्त केले आहे.
मुख्तार अन्सारीच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या अतुलवर वाराणसीतील एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. यानंतर मुलीने आत्मदहनही केले होते आणि तिचाही मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बराच गदारोळ झाल्यानंतर खासदार-आमदारांसाठीच्या विशेष न्यायालयाने अतुल राय यांच्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला. अतुल राय विरुद्ध हा गुन्हा 1 मे 2019 रोजी बलिया जिल्ह्यातील रहिवासी आणि वाराणसी येथील यूपी कॉलेजचा माजी विद्यार्थीनीने लंका पोलिस ठाण्यात दाखल केला होता. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बलात्कार पीडितेने आणि तिच्या साक्षीदाराने न्याय न मिळाल्याचा आणि विनाकारण छळ केल्याचा आरोप करत स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली होती.
फोटो काढून व्हिडिओ बनवला - 1 मे 2019 रोजी, पीडितेने तिच्या जबानीत म्हटले होते की, वाराणसीमध्ये शिकत असताना तिची अतुल राय यांच्याशी ओळख झाली होती. मार्च 2018 मध्ये अतुलने पत्नीला भेटायला सांगून तिला चिताईपूर येथील फ्लॅटवर नेले. पण तिथे कोणीच नव्हते. त्यादरम्यान त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचा फोटो काढून व्हिडिओ बनवला. यानंतर तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केला. विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी अतुल राय देत होता. पोलिसांनी गुन्हा नोंदवून अतुलचा शोध सुरू केला, तेव्हा अतुल राय सापडला नाही. परंतु लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर 22 जून 2019 रोजी अतुलने वाराणसी न्यायालयात आत्मसमर्पण केले. तेव्हापासून तो तुरुंगात होता.
सराईत गुन्हेगार म्हणून नोंद - गाझीपूर जिल्ह्यातील भंवरकोल पोलीस ठाण्याच्या बीरपूर गावचे मूळ रहिवासी असलेले अतुल राय हे वाराणसीतील मांडूवाडीह पोलीस ठाण्यात सराईत गुन्हेगार म्हणून नोंद आहेत. 2009 पासून अतुल राय यांच्यावर 27 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुख्तार अन्सारी यांना त्यांचा मुलगा अब्बास याला घोसीमधून बसपचा उमेदवार बनवायचा होता. परंतु, अतुल राय यांनी 14 एप्रिल 2019 रोजी घोसी लोकसभा मतदारसंघातून बसपाचे तिकीट मिळवले.