जम्मू: सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) गुरुवारी पहाटे जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ ( Jammu And Kashmir Arnia Sector ) एका संशयित पाकिस्तानी ड्रोनवर गोळीबार ( BSF troops fired On Pakistani Drone ) केला. गोळीबार होत असल्याचे लक्षात आल्याने ड्रोनला माघारी फिरावे लागले. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ड्रोनने कुठलेही हत्यार सोडले किंवा स्फोट झाला तर त्याचा तात्काळ शोध घेता यावा यासाठी परिसराचा कसून शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, अरनिया परिसरात पहाटे ४.१५ वाजता एक लाईट ऑन आणि ऑफ होताना दिसली, ती ड्रोन असल्याचा संशय आहे.
ते म्हणाले की, बीएसएफच्या जवानांनी सुमारे 300 मीटर उंचीवर असलेल्या उडत्या वस्तूवर तात्काळ गोळीबार केला आणि त्याला परत जाण्यास भाग पाडले. ते म्हणाले की जम्मू क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सीमेवर ड्रोनद्वारे पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांना शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटकांची तस्करी करण्याच्या घटनांबाबत सुरक्षा दल सतर्क आहेत. सुरक्षा दलांनी अलीकडेच जम्मू, कठुआ आणि सांबा सेक्टरमध्ये अनेक ड्रोन पाडले आहेत. ज्यामध्ये रायफल, आयईडी, ड्रग्स आणि बॉम्ब सापडले आहेत.
पोलिसांनी सोमवारी जम्मूच्या अखनूर सीमा भागात ड्रोनने टाकलेले तीन चुंबकीय आयईडीही जप्त केले. बीएसएफनेच ते ड्रोन पाडले. यापूर्वी 29 मे रोजी पोलिसांनी कठुआ जिल्ह्यातील राजबाग परिसरात ड्रोनसह सात बॉम्ब आणि अनेक 'अंडर बॅरल ग्रेनेड' (UBGs) जप्त केले होते.