बहराइच : जिल्ह्यातील कैसरगंज भागात हनीमूनच्या रात्रीच वधू-वराचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. आदल्याच दिवशी या दोघांनी सात फेरे घेऊन लग्नगाठ मारली होती. बुधवारी रात्री दोघेही खोलीत झोपायला गेले. गुरुवारी सकाळी उशिरापर्यंत त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला नव्हता. दरवाजा ठोठावल्यानंतरही आवाज आला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी खिडकीतून पाहिले असता, दोघांचेही मृतदेह बेडवर पडलेले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलीस अधिकारी कमलेश सिंह यांनी सांगितले की, कैसरगंज कोतवाली भागातील गोधिया नंबर 4 येथील रहिवासी सुंदर लाल यांचा मुलगा प्रताप (23) यांचा विवाह 30 मे रोजी गोधिया क्रमांक दोन, गुल्लानपुरवा गावातील रहिवासी पुष्पा मुलगी परशुराम हिच्यासोबत झाला होता. लग्नासाठी 31 मे रोजी वर आपल्या वधूसह गावात पोहोचला. रात्री घरी आलेले सर्व नातेवाईक जेवण करून झोपी गेले. नवविवाहित जोडपेही त्यांच्या खोलीत झोपायला गेले.
गुरुवारी सकाळी उशिरापर्यंत नवविवाहित जोडप्याच्या खोलीचा दरवाजा उघडला नव्हता. यामुळे घरातील सदस्यांना धाकधुक लागली होती. त्यांनी बाहेरून हाक मारली, दार ठोठावले, तरीही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर कुटुंबीयांनी खिडकीतून डोकावले असता दोघेही बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडले होते. घरातील सदस्यांनी शेवटी दरवाजाची कडी धडका देऊन उघडून आत प्रवेश केला. आत बघितले असता वधू-वरांचे श्वास थांबले होते, असे आढळून आले. या घटनेनंतर एकच गलका झाला. याची माहिती मिळताच वधू पक्षाचे लोकही घटनास्थळी पोहोचले.
कुटुंबीयांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. प्रभारी निरीक्षक राजनाथ सिंह आणि पोलिस अधिकारी कमलेश सिंहही गावात पोहोचले. तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजेल, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, मुलीच्या गावचे प्रमुख बलराम यादव सांगतात की, दोघांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. खोलीत समोसे आणि कोल्ड्रिंकच्या बाटल्याही सापडल्या आहेत.