ठाणे : शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले व ओढे तुडुंब भरून वाहत होते. शहरातील वाहत्या नाल्यात व खाडीपात्रात वाहून गेल्याने पाच वर्षीय चिमुरडीसह टोरेंट वीज कंपनीत कंत्राटी तत्वावर काम करणारा कामगार वीज वाहिनी दुरुस्तीचे काम करत असतानाच, खाडीच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाला. दोन्ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडल्या आहेत. घटनेच्या ४८ तासानंतर कामगाराचा मृतदेह सापडला आहे. मात्र, ५ वर्षीय चिमुरडीचा शोध लागला नाही. ( search of girl continues ) तिच्या मृतदेहाचे शोध कार्य बचाव पथकामार्फत तिसऱ्या दिवशी देखील सुरूच आहे.
२ तास ‘तो’ मदतीसाठी याचना - मृत उबेदूर रहमान अंसारी (वय ३६, रा.शांतीनगर ) हा आपल्या भावासह शुक्रवारी सायंकाळी कांबेगाव येथे टोरेंट वीज कंपनीच्या एका खासगी कंत्राटदाराकडे विजेचे काम करत होता. त्यावेळी काम करत असतानाच अचानक पुराचे पाणी त्याच्या चोही बाजूने वाढल्याने तो जीव वाचविण्यासाठी उच्चदाब असलेल्या विजेच्या तारेला लटकला. त्यानंतर सुमारे २ तास तो मदतीसाठी याचना करत होता. मात्र, त्याला कुठूनही मदत मिळाली नाही. टोरेंट वीज कंपनीच्या अधिकाऱ्यानेही माझ्या भावाच्या बचावासाठी बचाव पथक पाठवले नसल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे मृत उबेदूरच्या दोन मुलांवरून वडिलांचे छत्र हरपल्याने शांतीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाच वर्षीय चिमुरडीची शोध मोहीम सुरूच - दुसऱ्या घटनेतील गुलनाझ खातून मोहम्मद अख्तर अंसारी (वय पाच वर्ष रा.आझमी नगर दिवानशाह दर्गारोड) असे चिमुरडीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी तिचे वडील नमाज पठण करून आल्यानंतर विश्रांती घेत होते. यावेळी घराशेजारी असलेल्या नाल्यावर बनवलेल्या तात्पुरत्या स्वरूपाच्या लाकडी पुलावर गुलनाझ मैत्रिणीसह खेळत होती. यावेळी खेळता खेळता तिचा तोल गेल्याने ती नाल्यात पडून वाहून गेली. घटनेनंतर तिच्या वडिलांनी व परिसरातील नागरिकांनी तिला शोधण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, ती सापडली नाही. त्यांनतर मनपा आपत्ती विभाग व अग्निशमन दलाच्या जवानांनी शुक्रवारी सायंकाळी शोध घेतला. मात्र, ती न सापडल्याने शोध मोहीम थांबवून पुन्हा शनिवारी सकाळपासून तिची शोध मोहीम सुरू होती. मात्र, ४८ तास उलटल्यानंतरही तिचा शोध लागला नाही. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.