हैदराबाद - उत्तराखंडमधील पाचव्या विधानसभेचे चित्र स्पष्ट झाले असून मतदारांचा कौल भाजपकडे असल्याचे दिसत आहे. मागील चार विधानसभेचे निकाल काँग्रेसची सत्ता राज्यात येईल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवला जात होता. मात्र, भाजपकडे मतदारांचा कौल दिसून आला आहे. मात्र, मंत्री पुष्कर सिंह धामी यांचा पराभव झाला आहे. सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करत भाजपने इतिहास रचला आहे.

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचे चित्र काही वेळातच स्पष्ट होणार आहे. भाजप उत्तराखंडमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करेल, अशी शक्यता आतापर्यंतच्या निकालावरून दिसत आहे. राज्य स्थापनेनंतर पहिली विधानसभा निवडणूक 2002 साली झाली होती, त्यावेळी काँग्रेसने उत्तराखंडमध्ये सत्ता स्थापन केली होती. 2007 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सत्ता स्थापन केली, 2012 साली काँग्रेसने तर 2017 साली भाजपने सत्ता स्थापन केली होती. राज्य स्थापनेच्या 20 वर्षांत भाजप व काँग्रेसने दोन-दोनवेळा सत्ता उपभोगली. दरम्यान, सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करुन भाजपने इतिहास रचला आहे.

गंगोत्रीबाबची परंपरा सुरुच - उत्तरकाशी जिल्ह्याची गंगोत्री विधानसभा मतदारसंघात ज्या पक्षाचा उमेदवार जिंकून येतो, त्याच पक्षाची राज्यात सत्ता स्थापन होते, असा समज आहे. उत्तराखंड राज्याच्या स्थापनेनंतर 2002 मध्ये पहिली विधानसभा निवडणूक झाली. गंगोत्री मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार विजयपाल सजवाण हे विजयी झाले होते व काँग्रेसची सत्ता स्थापन झाली होती. 2007 साली भाजपचे उमेदवार गोपाल सिंह रावत यांनी आमदारकी जिंकली व राज्यात भाजपची सत्ता आली. 2012 साली विजयपाल सजवाण हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले व राज्यात काँग्रेसची सत्ता आली. तसेच 2017 साली भाजपचे उमेदवार गोपाल सिंह रावत यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली व ते जिंकले. त्यावेळी भाजपची सत्ता आली होती. सध्या 2022 गोपाल सिंह रावत यांचा मृत्यू झाल्याने भाजपने सुरेश चौहान यांना मैदानात उतरवले होते. सुरेश चौहान यांचा विजय झाला असून आता भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.


प्रचार, सभा घेत भाजपने पिंजून काढलं होतं राज्य - यंदाची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनवत भाजपच्या दिग्गज नेत्यांनी देवभूमी उत्तराखंड येथे हजेरी लावली होती. भाजपकडून तब्बल 695 रॅली व सभा घेण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Union Minister Amit Shah ), रक्षामंत्री राजनाथ सिंह ( Rajnath Singh ), भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हजेरी लावली. नेहमी प्रमाणे यावेळीही नरेंद्र मोदी हे प्रचारासाठी सर्वांच्या पुढे होते. 695 पैकी 151 सभा एकट्या मोदींनी घेतल्या. त्यापैकी 148 व्हर्च्युअल व 3 प्रत्यक्ष सभा झाल्या. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी राज्यात 177 प्रत्यक्ष सभा घेतल्या तर राज्यातील भाजप नेत्यांनी 280 प्रत्यक्ष व 87 व्हर्च्युअल सभा घेतल्या. त्याचे परिणाम आज सर्वांसमोर असून भाजप राज्यात सत्ता स्थापन करणार आहे.

मोजक्याच सभा घेतल्याने काँग्रेसला फटका - कोणत्याही निवडणुकीत प्रचार, सभा, रॅली या महत्त्वाच्या बाबी आहेत. या माध्यमातूनच आपल्याला आपला पक्ष घराघरात पोहोचवता येतो. मात्र, काँग्रेसने उत्तराखंडकडे जास्त लक्ष न देता मोजक्याच सभा घेतल्या. राहुल गांधी व प्रियांका गांधी वाड्रा यांनी प्रत्येकी चार-चार सभा घेतल्याने याचा फटका पक्षाला बसला आहे. काँग्रेसने राज्यात 200 पेक्षा अधिक रॅली व प्रचार सभा घेतल्या असून काँग्रेसचे 30 स्टार प्रचारक मैदानात उतरले होते. त्यातील 21 स्टार प्रचारकांनी दोनशेहून अधिक सभा घेतल्या. राहुल गांधी व प्रियांका गांधी वाड्रा यांनी प्रत्येकी चार जनसभा घेतल्या. उत्तराखंडमधील काँग्रेसचे दिग्गज नेते हरीश रावत यांनी संपूर्ण म्हणजेच 70 विधानसभा मतदारसंघात व्हर्च्युअल सभा घेतल्या आहेत. मात्र, याचा म्हणावा तितका फायदा झाला नाही.
