कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना रंगला असून दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने राज्यात जातीय संघर्ष सुरू केल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी केला. दक्षिण 24 परगणामधील रैदिघी येथे निवडणूक रॅलीला त्या संबोधित करत होत्या.
ममता बॅनर्जी यांनी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही टीका केली. मुस्लिमांना मतांचे ध्रुवीकरण करणाऱ्या एआयएमआयएमच्या जाळण्यात न अडकण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. एआयएमआयएम हा भाजपाला समर्थन करणार पक्ष आहे. एआयएमआयएम आणि त्यांच्या बंगालच्या मित्रपक्षांच्या जाळ्यात पडू नका, असे त्या म्हणाल्या. तथापि, ओवेसी आणि सिद्दीकी दोघांनीही टीएमसीचे आरोप फेटाळून लावले.
दीदींचा हिंदू अस्मितेवर जोर -
भाजपा जातीय संघर्ष निर्माण करत आहे. त्यामुळे तुमच्या भागात वाद पेटवण्यासाठी आलेल्या बाहेरील लोकांना पळवून लावा, असे त्या म्हणाल्या. तसेच हिंदू अस्मितेवर जोर देत ममता म्हणाल्या, की मी हिंदू आहे. दररोज घर सोडण्यापूर्वी चंडी मंत्राचा जप करते. पण प्रत्येक धर्माचा सन्मान करण्याच्या परंपरेवर माझा विश्वास आहे.
भाजपा दलितविरोधी -
भाजपा नेत्यांनी दलितांच्या घरात जेवण केल्याच्या घटनांवर त्यांनी टीका केली. मी एक ब्राह्मण महिला आहे. पण माझ्या जवळची सहकारी अनुसूचित जातीची महिला आहे. ती माझ्या प्रत्येक गरजा भागवते. ती माझ्यासाठी भोजन बनवते. मला त्याचा प्रचार करण्याची गरज नाही. मात्र, काही लोक आहेत. जे मतांसाठी हॉटेलमधून जेवण मागवून दलिताच्या घरी जेवण्याची नौटंकी करतात. ते लोक दलितविरोधी, अल्पसंख्याकविरोधी आहेत, असे बॅनर्जी म्हणाल्या.
नंदीग्राममधून मीच जिंकणार -
पश्चिम बंगालमध्ये भाजपाची सत्ता आल्यास सुधारित नागरिकत्व कायदा व एनआरसी लागू झाल्यास बहुतेक नागरिकांना येथून निघून जावे लागेल, असे त्या म्हणाल्या. तसेच नंदीग्राममधून आपणच विजयी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - नजरचूक! हा तर 'धक्कादायक विनोद' म्हणावा लागेल