सिवान Bird Like Jatayu : बिहारच्या सिवानमध्ये काही विचित्र पक्षी आढळले आहेत. या पक्षांचा आवाज सापासारखा तर चेहरा घुबडासारखा आहे. काही लोक यांचा संबंध रामायणातील जटायूशी जोडत आहेत. या पक्षांना पाहण्यासाठी गावात मोठी गर्दी झाली होती. बिहार-उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती भागातील विसवार गावात हे पक्षी दिसले. येथील मनन सिंग यांच्या बंद घरात ते तळ ठोकून होते.
सापासारखा आवाज : मनन सिंग यांनी सांगितलं की, जेव्हा ते खोली उघडण्यासाठी गेले तेव्हा एकाच वेळी अनेक सापांच्या फुत्काराचा आवाज आला. खोलीत साप असल्याच्या भीतीनं त्यांनी सर्पमित्राला पाचारण केलं. यानंतर सर्पमित्र आले आणि त्यांनी दरवाजा उघडताच खोलीत घुबडासारखा विचित्र प्राणी पाहून ते देखील घाबरले. सर्पमित्रानं हिंमत एकवटून या पक्षांना बाहेर काढलं.
जटायू असल्याची अफवा : या पक्षांना पाहताच स्थानिक लोकांनी जटायूच्या आगमनाचा वावड्या उडवल्या. त्यांना पाहण्यासाठी लांबून लोक येऊ लागले. या पक्षांचा रंग पांढरा, डोळे काळे तर पाय आणि चोच टोकदार आहे. लोकांनी वनविभागाच्या पथकाला याबाबत माहिती दिली. हे पक्षी गेल्या आठवडाभरापासून या खोलीत तळ ठोकून होते, असं सांगण्यात येतंय. स्थानिक लोक या पक्षांना रामायणातील जटायू मानून खायला देऊ लागले. मात्र त्यांनी काहीही खाल्लं नाही. यानंतर त्यांना गव्हाचे दाणे आणि पेरू देण्यात आले. हे मात्र त्यांनी मोठ्या उत्साहानं खाल्लं.
परदेशी घुबडाची प्रजाती : हे पक्षी म्हणजे अमेरिकन घुबडाची एक प्रजाती आहे, ज्यांना 'बर्फातील घुबड' असंही म्हणतात. ते बहुतेकदा अमेरिका, इंग्लंड, युरोप यांसारख्या थंड प्रदेशात आढळतात. बिहारमधील थंडीमुळे ते तेथे पोहोचले असावे. याआधीही येथे थंडीच्या काळात हे घुबड दिसले आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये बिहारच्या सुपौलमध्ये असेच एक घुबड पेरूच्या बागेत जखमी अवस्थेत सापडले होते. उपचारानंतर त्याला पटना प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आलं होतं. हे घुबड पिकांमधील उंदीर आणि कीटकांची शिकार करतं.
हे वाचलंत का :