कांगडा - हिमाचल प्रदेशात 'बर्ड फ्लू' आजाराचा प्रसार होत असून आत्तापर्यंत सतराशेपेक्षा जास्त स्थलांतरीत पक्षांचा मृत्यू झाला आहे. कांडगा जिल्ह्यातील पौंग धरणक्षेत्रात स्थलांतरीत पक्षांचा मृत्यू झाला असून प्रशासन सतर्क झाले आहे. धरणक्षेत्रात आणि शेजारील चार मतदार संघात मटन,अंडी, मासे विक्रीला प्रशासनाने बंदी आणली आहे.
मृत पक्षांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. मागील आठवड्यात अज्ञात कारणाने अनेक पक्षांचे मृत्यू व्हायला लागले. मात्र, तपासात मृत्यूमागचे कारण बर्ड फ्लू असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील विविध प्रयोगशाळांत मृत पक्षांचे नमुने पाठविण्यात आले आहेत. मात्र, भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या पक्षांचे नमुने अद्याप आले नाहीत.
पौंग धरण परिसरात हाय अलर्ट
धरण क्षेत्रात पक्षांच्या मृत्यू नंतर जिल्हा प्रशासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार धरण क्षेत्रातील चार मतदार संघात अंडे, चिकन, मटन आणि मासे विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. पौंग धरणात आधापासूनच नौकानयन, मासेमारी आणि पर्यटनाला बंदी आहे. इंदौर, ज्वाली, नुरपूर, फतेहपूर या चार विधानसभा क्षेत्रात मांसाहा विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत विक्री आणि वाहतूक बंदी राहणार आहे.
१० किमी परिसरातील व्यवहारांवर बंदी-
प्रशासनाने बर्ड फ्लूच्या भीतीने धरणच्या १० कि. मी परिसरात सर्व व्यवहारांवर बंदी आणली आहे. नागरिकांनी त्यांच्याजवळील जनावरांना धरण परिसरात जाण्यापासून रोखावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.
राजस्थानमध्येही बर्ड फ्लूचा प्रसार -
राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यामध्ये अचानक पसरलेल्या बर्ड फ्लूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात आतापर्यंत शेकडो कावळ्यांचा यामुळे मृत्यू झाला असून, जिल्हा प्रशासनाने आता रॅपिड रिस्पॉन्स पथकाला पाचारण केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांच्या सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून बालाजी परिसराच्या एक किलोमीटर भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे. गेल्या २५ डिसेंबरपासून या परिसरातील शेकडो कावळ्यांचा अचानक मृत्यू होताना दिसून आला. त्यानंतर त्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवल्यानंतर या भागात एवियन इन्फ्लुएंझा या आजाराचा प्रसार झाल्याचे समजले. यानंतर हा आजार पसरु नये यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.