नवी दिल्ली - भारतातील गुजरात राज्यात पहिल्यांदाच एक तृतीयपंथीय कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएसएस) चालवत आहे. झोया खान असे या तृतीयपंथीय महिलेचे नाव असल्याची माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी ट्विटरवरून दिली. गुजरातमधील वडोदरा येथे हे सेंटर सुरु आहे.
टेलिमेडिसिन कन्सल्टींगच्या कामासाठी झोया कॉमन सर्व्हिस सेंटर चालवत आहे. यामध्ये ती स्वत: ऑपरेटर म्हणून काम पाहते. या सेंटरद्वारे रुग्णांना व्हिडिओच्या माध्यमातून सल्ला घेता येणार आहे. झोया तिच्या कामातून तृतीयपंथीय समाजाला शिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवून आहे. त्यांना चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात, डिजिटल तंत्रज्ञान समजावे, यासाठी झोया प्रयत्न करणार आहे. डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत देशभरामध्ये सीएसएस म्हणजेच सामान्य सेवा केंद्र सुरु करण्यात येत आहेत.
तृतीयपंथीयांना इतरांसारख्या कामाच्या संधी मिळाव्या म्हणून सरकारच्या अनेक विभागांकडून प्रयत्न सुरु आहेत. निमलष्करी दलात 'ट्रान्सजेंडर' म्हणजेच तृतीयपंथीयांची भरती करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालय गंभीरपणे विचार करत असून विविध निमलष्करी दलांकडे सूचना मागविल्या आहेत. निमलष्करी दलात 'असिस्टंट कमांडंट' पदावर तृतीयपंथीयांची भरती करण्याचा विचार गृहमंत्रालय करत आहे.