भोपाल - शंभर मीटरचे अंतर अनवाणी पायाने पार करणाऱ्या युवकाचा व्हीडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या युवकाचा शोध घेऊन सरकाने त्याची धावण्याची चाचणी घेतली. यावेळी १०० मीटरचे अंतर त्याने १३ सेकंदात पार केले. मी यापेक्षा चांगली कामगिरी करू शकतो असा विश्वास त्याने व्यक्त केला.
१९ वर्षांचा रामेश्वर गुर्जर हा शिवपुरी गावचा रहिवासी आहे. रामेश्वरचा अनवाणी धावतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत तो १०० मीटरचे अंतर ११ सेकंदात पार करतो. यानंतर त्याची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली. भोपालमधल्या टीटी क्रीडा मैदानावर त्याची धावण्याची चाचणी घेण्यात आली.
यावेळी रामेश्वरने १०० मीटरचे अंतर १३ सेकंदात पार केले. रामेश्वरला आता शासनाकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण मिळाल्यावर मी यापेक्षा चांगली कामगिरी करेन, असा विश्वास रामेश्वरने व्यक्त केला. तसेच, पायात धावण्याचे शूज घातले तर माझ्या कामगिरीवर याचा सकारात्मक परिणाम होईल, असेही तो म्हणाला.
मध्य प्रदेशचे क्रीडा मंत्री जितू पटवारी म्हणाले, की आज रामेश्वर आधीचे टार्गेट गाठू शकला नाही. पण, तो एक महिन्यासाठी सराव करेल. त्याला चांगल्या आहाराची गरज आहे. सरकार त्याला नक्की मदत करेल.