लखनऊ - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा दिवसेंदिवस भारतातही प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशातील सर्वच राज्याचे प्रशासन या संकाटचा मुकाबला करत आहे. संपूर्ण देशभर लॉकडाऊन असल्याने अनेक ठिकाणी लोकांच्या खाण्या पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सक्त सुचना केल्या आहेत. गरजूंना जर योग्य वेळेत जेवण नाही पोहोचले तर जिल्हाधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळी 10 ते 2 आणि 6 ते 8 यावेळेत गरजूंना जेवण मिळणे आवश्यक असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. गरजूंना वेळेत जेवण देणे गरजेचे आहे. याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी, त्यांना जेवण पोहचण्यास विलंब करु नये, अश्या सुचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.
ज्यांना ज्यांना मदत हवी आहे त्यांनी हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. राज्याच्या 23 कोटी जनतेचे हित हीच आमची प्राथमिकता असल्याचे ते म्हणाले. तसेच राज्यातील 23 कोटी जनतेसाठी 66 कोटी तीन पदरी खादीच्या कापडाचे मास्क तयार करण्यात येणार आहेत. सरकारतर्फे गरिबांना हे मास्क मोफत मिळतील. बाकी लोकांना अत्यंत रास्त दरात हे मास्क उपलब्ध होतील. हे मास्क कपड्याचे बनवले असल्याने ते धुऊन पुन्हा पुन्हा वापरणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.