नवी दिल्ली - देशाचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. स्थलांतरीत मजुरांना घरी पोहचवण्यासाठी लष्कराची मदत घ्यावी, अशी मागणी करत ते दिल्लीतील राजघाटवर आंदोलन करत होते.
यशवंत सिन्हा यांचे राजघाटवर आंदोलन सुरू होते, तेव्हा त्यांच्यासोबत आम आदमी पक्षाचे संजय सिंह आणि दिलीप पांडे हेदेखील उपस्थित होते. परराज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांना पायी चालत जाण्यास हे सरकार भाग पाडत आहे, यामध्ये कित्येक मजुरांचा मृत्यूही होत आहे अशी टीका सिन्हा यांनी सरकारवर केली.
सिन्हा यावेळी म्हणाले, की मजुरांना आपापल्या राज्यामध्ये पोहोचवण्याची जबाबदारी ही लष्कराकडे आणि पॅरामिलीटरी फोर्सेसकडे सोपवण्यात यावी एवढीच आमची मागणी आहे.
तर भाजप केवळ श्रीमंत लोकांचाच विचार करते, आणि गरिबांकडे दुर्लक्ष करते, अशी टीका आपचे खासदार संजय सिंह यांनी केली. या गरीब मजुरांना मदत करण्याची सरकारची इच्छाच नसल्यामुळे त्यांच्याकडे यासाठी कोणतीही योजना तयार नाही, असेही सिंह म्हणाले.
केंद्र सरकार दिवसाला २० हजार रेल्वे गाड्या चालवू शकते. त्यांमधून दिवसाला २.३ कोटी लोकांना दररोज एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणे शक्य आहे. याचा विचार केंद्र सरकारने करायला हवा, असे मत आप आमदार दिलीप पांडे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : महाराष्ट्रासह अन्य चार राज्यांतील नागरिकांना ३१ मेपर्यंत कर्नाटकात प्रवेश नाही