नवी दिल्ली - बंगालमधील शेतकऱ्यांना ममता बॅनर्जी पीएम-किसान सन्मान योजनेचा लाभ मिळू देत नाहीत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर लगेचच केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी बंगालच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळण्यापासून अडवू नका, असे पत्र ममता बॅनर्जी यांना लिहल्याचे तोमर यांनी सांगितले. बंगालच्या मुख्यमंत्री केंद्राच्या योजनेवरून राजकारण करत असल्याची टीका मोदींनी आज सहा राज्यातील शेतकऱ्यांशी बोलताना केली होती.
शेतकऱ्यांच्या आडून विरोधक डाव साधतायेत -
कृषीमंत्री नरेद्र सिंह तोमर यांनी यावेळी राजकीय विरोधकांवरही टीका केली. विरोधक त्यांनी विचारसरणी शेतकऱ्यांच्या आडून पुढे नेत आहेत. मात्र, याचा तोटा शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवून चर्चा करावी, असे आवाहन तोमर यांनी शेतकऱ्यांना केले. कृषी मंत्रालयाने जमा केलेल्या माहितीनुसार, बंगालमधील सत्तर लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असता. मात्र, बंगाल सरकारने या योजनेत सहभाग घेतला नाही. पंतप्रधान मोदींनीही शेतकऱ्यांशी संवाद साधताना सत्तर लाख शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित ठेवल्याचे वक्तव्य केले होते.
बंगाल सरकार वगळता सर्व राज्य सरकारांनी पीएम किसान सन्मान निधीची रक्कम स्वीकारली. आत्तापर्यंत साडेदहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर ९६ हजार कोटी रुपये हस्तांतरीत केल्याचे तोमर म्हणाले.
ममता सरकारच्या विचारधारेनं राज्याचे नुकसान
बंगालमधील २३ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. मात्र, बंगाल सरकारने पडताळणी थांबवली. जर तुम्ही १५ वर्षांपूर्वीची ममता बॅनर्जी यांनी भाषणे ऐकालं तर तुम्हाला समजेलं त्यांनी किती राज्याचं नुकसान केलं आहे. जनता हे सर्व पाहत आहे. जे पक्ष बंगालमधील शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलत नाहीत, ते आता दिल्लीकरांना सतावत आहेत, असे म्हणत त्यांनी डाव्या पक्षांवर निशाणा साधला.