चंदिगढ - भाजप पंजाबात जातीय दुफळी निर्माण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी केला. मात्र, त्यांना या प्रयत्नात यशस्वी होऊ देणार नाही. जातीय राजकारणाचा फायदा उचलण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे, मात्र, त्यांचा हा अजेंडा यशस्वी होऊ देणार नाही, असे सिंह म्हणाले. भाजपने पंजाबात 'दलित इन्साफ यात्रा' आयोजित केली आहे, त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.
'पंजाबातील शांततापूर्ण वातावरण मी त्यांना (भाजप) कोणत्याही परिस्थितीत बिघडू देणार नाही. फोडाफोडीची ही नीती पंजाबात यशस्वी होणार नाही. दलितांबद्दल बोलण्याचा भाजपला कोणताही नैतिक अधिकार नाही. ज्या राज्यात भाजपची सत्ता आली तेथे दलितांची स्थिती वाईट झाली. उत्तर प्रदेशात दलितांवरील हल्ले वाढले असल्याचे त्यांनी आकडेवारीचा दाखला देत सांगितले. भाजपच्या सत्ताकाळात उत्तर प्रदेशात देशातील दलितांवरील एकूण अत्याचारापैकी २५ टक्के घटना घडल्याचे ते म्हणाले.
बेकायदेशीर आणि अन्यायकारी कृषी कायदे मंजूर केल्यानंतर भाजप कोंडीत सापडला आहे. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी भाजप कुरघोड्या करत असल्याचे सिंह म्हणाले. केंद्राने अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृतीही अचानक बंद केली. त्याचवेळी पंजाब सरकारने यशस्वीपणे राज्याची शिष्यवृती योजना सुरू केली, असे सिंह म्हणाले.