नालंदा- बिहारच्या नालंदा जिल्ह्यात एका क्षयरोगग्रस्त गरीब महिलेने उपचारासाठी चक्क पोटच्या बाळाला विकण्याचा प्रयत्न केला. सोनम देवी असे या महिलेचे नाव आहे. बाळाला विकल्यानंतर उपचारासाठी पैसे मिळतील, अशी सोनमला आशा होती. यासाठी ती बिहारशरीफ सदर रुग्णालयात पोहचली आणि उपचारासाठी बाळाला विकायचे असल्याचे काही लोकांना सांगितले.
सदरील महिला वीट भट्टीवर कामाला असून तिला काही दिवसांपूर्वी क्षयरोग झाला होता. तिला दोन अपत्य असून यामध्ये दोन वर्षीय मुलगी आणि ६ वर्षीय मूलगा आहे. महिलेचा पती पंधरा दिवसांपूर्वी तिला सोडून गेला आहे. या महिलेने पहिल्या पतिच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न केले होते.
हलाखीची परिस्थिती असल्याने आजारावरील उपचाराचा खर्च महिलेला पेलवत नव्हता. सोनम क्षयरोगावरील उपचारासाठी हरनौत येथील कल्याणबीघा रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला बिहारशरीफ सदर रुग्णालयासाठी रेफर केले. सदर रुग्णालयात आल्यानंतर महिलेने उपचारासाठी बाळाला विकायचे असल्याचे काही लोकांना सांगितले.
या प्रकाराची माहिती थेट जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर माध्यमांमध्ये ही बातमी वेगाने पसरली. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत महिला आणि तिच्या दोन्ही मुलांवर उपचार करण्याचे निर्देश आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. यानंतर महिलेला क्षयरोग विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच दोन्ही कुपोषित मुलांना पोषण पुनर्वास केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता महिलेवर आणि मुलांवर मोफत उपचार करण्यात येणार असून आर्थिक मदतही देण्यात येणार आहे.