सुरत - शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून देशभरात जल्लोषाला सुरुवात झाली आहे. दरवर्षी या उत्सवादरम्यान तरुणाई वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू गोंदवून घेत असते. मात्र या वर्षीची टॅटूची थीम काही अफलातूनच आहे. चांद्रयान -२ आणि नवे वाहतूक नियम अशा मुद्यांवर तरुणाई टॅटूद्वारे व्यक्त होत आहे.
काही वर्षांपासून गरब्यामध्ये टॅटूची मोठी चलती आहे. सध्या तर टॅटू हा तरुणांसाठी स्टाइल सिम्बॉल झाला आहे. गुजरातमध्ये सरकारच्या निर्णयाचे आणि कामगिरीविषयीचे टॅटू काढण्याची तरुणींमध्ये क्रेझ आहे. मोदी -ट्रम्प यांच्या मैत्रीचे, च्रांद्रयान-२ , प्लास्टिक बॅन, आणि काश्मीरमधील कलम ३७० या थीमवर तरुण महिला टॅटू बनवून घेत आहेत. हे टॅटू मोठे लोकप्रिय झाले आहेत.
नवरात्रीत पाठीवर टॅटू काढण्यास मुलींनी जास्त प्राधान्य दिले आहे. त्यासाठी खास बॅकलेस घागरा आणि चोलीची फॅशन निवडण्यात येते. बॅकलेस चोळीमुळे सौंदर्य अधिक खुलून दिसतेच परंतू टॅटूमुळे त्यात आणखी भर पडते.