जयपूर - एकोणीस वर्षांपूर्वी पाकिस्तानातील सिंध प्रांतातून भारतात आलेली एक महिला राजस्थानमधील एका गावची सरपंच झाली आहे. नीता कंवर (वय-36) असे या महिला सरपंचाचे नाव आहे. टोंक जिल्ह्यातील नतवाडा या गावच्या सरपंच म्हणून नीता यांची निवड झाली आहे. त्यांनी 365 मतांनी गावातील निवडणुकीत विजय मिळवला.
नीता कंवर या 2001 मध्ये चांगल्या शिक्षणासाठी सिंध प्रांतातून राजस्थान येथे आल्या. त्यांनी 2005 मध्ये अजमेरच्या सोफिया महाविद्यालयातून बीएची पदवी मिळवली. त्यानंतर 2011 मध्ये पुण्य प्रताप करण यांच्याशी त्यांचा विवाह झाला. भारतीय नागरिकाशी लग्न केल्यानंतर नीता यांनी भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी आठ वर्ष लढा दिला.
हेही वाचा - वयाच्या ९७ व्या वर्षी निवडणुकींच मैदान गाजवत आजीबाई बनल्या सरपंच
व्यवस्थेसोबत आठ वर्ष लढा दिल्यानंतर मला भारताचे नागरिकत्व मिळाले. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जिल्हा प्रशासनाने मला नागरिकत्वाची कागदपत्रे दिली. त्यामुळे मी गावातील सरंपचपदाची निवडणूक लढवू शकले, अशी प्रतिक्रिया नीता कुंवर यांनी दिली.