बंगळुरू - प्रियकराचे गुप्तांग कापल्याप्रकरणी बंगळुरू येथील कोरमंगला शहरातील एका न्यायालयाने आरोपी दंतवैद्यकीय महिलेला दोषी ठरवले आहे. या महिलेला दहा वर्षांची शिक्षा सुनावली असून सोबतच १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पीडित व्यक्तीला दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी, असेही न्यायालयाने या महिलेला सांगितले.
महिलेचे पीडित व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, प्रियकराने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्याने ती नाराज झाली होती. ती तिच्यावर प्रेम करण्यासाठी दबाव आणत होती. मात्र, पीडित व्यक्ती तिला टाळत होता. याचा राग मनात धरून प्रियकराला आपल्या दंत रुग्णालयात बोलावले आणि ज्यूसमध्ये गुंगीचे औषध टाकून त्याला पाजले. तो बेशुद्ध झाल्यानंतर रुग्णालयातील साहित्याच्या साहाय्याने त्याचे गुप्तांग कापले. यानंतर ती स्व:त त्याला रुग्णालयात घेऊन गेली आणि तेथून फरार झाली.
पीडित व्यक्तीने याविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने महिलेला दहा वर्षांची शिक्षा सुनावली असून नुकसान भरपाईसाठी २ लाख रुपये द्यावेत, असे सांगितले आहे. ही घटना २९ नोव्हेंबर २००८ रोजी घडली होती. त्यावर न्यायालयाने ११ डिसेंबरला निकाल दिला.