नवी दिल्ली - राजधानी दिल्ली आणि उत्तर भारतामध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. सोमवारी दिल्लीमधील थंडीने तब्बल 119 वर्ष जुना रेकार्ड मोडला आहे. सोमवारचा दिवस हा 1901 नंतरचा सर्वांत जास्त थंडी पडलेला दिवस असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
दिल्लीचे सोमवारी किमान तापमान 2.6 अंश तापमान होते. दुपारी अडीच वाजता सफदरजंग येथे 9.4 अंश तापमान नोंदविण्यात आले. याआधी 1901 मध्ये दिल्लीकरांना कुडकुडत काढावे लागले होते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. 1901 नंतर पहिल्यांदाच दिल्लीमध्ये रेकार्डब्रेक थंडी पडली आहे.
दिल्लीसह नोएडा, गाझियाबाद, फरीदाबाद आणि गुरुग्राम येथे देखील थंडीचा कहर सुरू आहे. येणाऱ्या काही दिवसात ही थंडी अजून वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून मिळाली. थंडीसोबत दाट धुकेही पडत असल्यामुळे त्याचा थेट प्रभाव रेल्वेवाहतूक आणि हवाई वाहतुकीवर पडत आहे. गेल्या 16 दिवसांपासून दिल्लीतील तापमान सलग घसरत असून येत्या काही दिवसात पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे.