नवी दिल्ली - पाकिस्तानविरूद्ध आपले शौर्य दाखवून वीरचक्र पुरस्कारावर आपले नाव कोरलेले, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे हवाई दलात पुन्हा कार्यरत झाले आहेत. शिवाय, ज्या लढाऊ विमानाने अभिनंदन यांना पाकिस्तानच्या 'एफ-१६' या लढाऊ विमानाचा पाडाव केला होता, तशाच 'मिग-२१' विमानावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पाकिस्तानविरूद्ध झालेल्या एअर स्ट्राईकच्या वेळी अभिनंदन हे जखमी झाले होते. हवाई हल्ला चालू असताना 'मिग २१' कोसळले होते. त्यावेळी अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. त्यासोबतच, लष्कराची गुप्त माहिती मिळवण्यासाठी त्यांचा छळदेखील करण्यात आला होता. नंतर, आंतरराष्ट्रीय स्तरावरून झालेल्या दबावामुळे पाकिस्तानकडे त्यांना सोडण्यावाचून पर्याय उरला नाही.
या सर्वाचा परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावर झाला होता. त्यामुळे, त्यांना काही काळ विश्रांती घेण्यास सांगितले गेले होते. मात्र, आता वैद्यकीय मंजूरीनंतर ते पुन्हा हवाई दलात कार्यरत होणार आहेत. अभिनंदन यांची पश्चिमी वाळवंटातील 'मिग-२१ बायसन एअर बेस'वर नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, अभिनंदन यांचा छळ करणाऱया पाकिस्तानी जवानाचा मागील आठवड्यातच खात्मा करण्यात आला आहे. अहमद खान असे या पाक सैनिकाचे नाव होते. १७ ऑगस्ट रोजी झालेल्या गोळीबारात अहमद खान ठार झाला.