नवी दिल्ली - सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महागठबंधनकडून जनतेला विविध आश्वासने देण्यात येत आहेत. आज (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी दोघेही स्टार प्रचारक बिहारच्या दौऱ्यावर असून विशाल सभांना संबोधित करत आहेत. बिहारला विशेष दर्जा देण्याची घोषणा करण्याची हिंमत पंतप्रधान मोदी दाखवतील का? असा सवाल काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांना विचारला आहे.
'पंतप्रधान मोदी बिहारला विशेष दर्जा देण्याचे हिंमत दाखवतील का? भागलपूरमध्ये केंद्रीय विद्यापीठ कुठे आहे? १२ कोटी बिहारी जनतेच्या अशा अनेक प्रश्नांना मोदींना उत्तरे द्यावी लागणार आहेत. बिहारी जनतेला फसवण्यासाठी पंतप्रधान मोदी राज्यात आले आहेत. भाजपा आणि पंतप्रधानांनी बिहारबरोबर भेदभाव केला असून त्यांना याचे उत्तर द्यावे लागणार आहे, असे सुरजेवाला म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधींनीही केला हल्लाबोल
राहुल गांधी यांच्या आज बिहारमध्ये प्रचार सभा सुरू आहेत. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून पंतप्रधानांना लक्ष्य केले. 'मोदी जेथे जातात तेथे खोटेच बोलतात, असे सांगत, कोरोना संकटावरून राहुल गांधींनी मोदींवर टीका केली. 22 दिवसांत कोरोना बरा होण्याविषयी मोदी बोलले होते. मात्र, तसे झाले नाही. बिहारमधील लोक उपासमारीने मरण पावले. स्थलांतरीत कामगरांना मदत केली नाही,' असेही राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींनी कृषी कायद्यावरून मोदींवर टीका केली.
राहुल गांधी आज दोन प्रचार सभा घेणार आहेत. या सभांना आरजेडी नेते तेजस्वी यादवही उपस्थित रहाणार आहेत. 243 विधानसभा जागा असणार्या बिहारमध्ये तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबरला मतदान होईल. निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर होतील.