नवी दिल्ली - भारताचे नववे राष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा यांच्या पत्नी विमला शर्मा यांनी 93 व्या वर्षी कोरोनाला हरविले आहे. विमला शर्मा या कोरोना संसर्गातून बरे होणाऱ्या देशातील सर्वात वृद्ध व्यक्ती ठरल्या आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
काल (गुरुवार) सायंकाळी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 'कोरोना आजाराबाबत विचित्र गोष्ट म्हणजे तुम्ही रुग्णाला भेटू शकत नाही. मी रुग्णालयात आईशी फक्त दोनदा बोललो. 18 दिवसांपासून आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, कुटुंबियांनी आणि रुग्णाने आशा सोडायला नको, हे महत्त्वाचे आहे, असे मुलगा आशुतोष दयाल शर्मा यांने भावना व्यक्त केल्या.
विमला शर्मा या मागील 18 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होत्या. 5 जूनला शरिरातील ऑक्सिजन कमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 15 दिवसानंतर त्यांनी पुन्हा कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.