हैदराबाद - सेवानिवृत्तीचे नियोजन किंवा नंतरच्या आयुष्याची तजवीज यांचे मुल्यमापन केले असता, भारताच्या गरजा इतर देशांपेक्षा वेगळ्या आहेत. भारतीयांना लवकर सेवानिवृत्ती घ्यावी वाटते. कारण त्यांना मनापासून आवडणारी एखादी गोष्ट करण्याचे किंवा समाजकार्यात झोकून देण्याचे ध्येय डोळ्यापुढे असते. मात्र, त्यांचे सेवानिवृत्तीचे ध्येय पूर्ण करण्यात एक प्रकारची पोकळी जाणवते.
ही बाब महिलांच्या आणि विशेषतः काम करणाऱ्या महिलांबाबच अधिक प्रकर्षाने जाणवते. विविध अहवालांतून असे दिसून आले आहे की, सेवानिवृत्तीची वेळ येते तेव्हा पुरुषांच्या तुलनेत महिलांची आर्थिकदृष्ट्या तयारी कमी असते, तसेच त्यांच्या सेवानिवृत्तीच्या गरजांची पुर्तता करण्याची देखील त्यांची विशेष तयारी झालेली नसते.
महिला, आणि काम करणाऱ्या महिलांनी त्यांच्या सेवानिवृत्तीचे नियोजन करण्याची काही कारणे आहेत; विशेष म्हणजे, जेव्हा आपण हे जाणतो की सेवानिवृत्ती ही मिलेनिअल्स अर्थात् आजच्या तरुण पिढीच्या महत्त्वाच्या ध्येयांपैकी एक आहे. स्त्री-पुरुष वेतनातील असमानता (जेंडर पे गॅप), कौटुंबिक प्रकरणे, सरासरी आयुर्मान ही त्यापैकी काही मुख्य कारणे आहेत. या प्रत्येक पैलुवर तसेच महिलांनी आपले निवृत्त आयुष्याचे ध्येय साध्य करण्यासाठी अधिक नियोजन का करायला हवे असे मत लेखकाने व्यक्त केले आहे.
आर्थिक विषमता
स्त्री आणि पुरुषाला मिळणाऱ्या वेतनातील विषमता खरोखर अस्तित्वात आहे. याचाच अर्थ असा की, पुरुषांच्या तुलनेत महिलांची कमी पैशांची बचत होत असणार. लिंगभेदावर आधारित वेतनातील विषमतेव्यतिरिक्त, मुले किंवा ज्येष्ठ नातेवाईकांची काळजी घेण्यासाठी महिला अधिक काळ कामापासून लांब राहण्याची शक्यता असते. जरी अधिकाधिक पुरुषांमध्ये काळजी घेण्यासंदर्भातील अशा जबाबदाऱ्या घेण्याचे प्रमाण वाढत असले, तरी आपल्या देशात प्रामुख्याने ही भूमिका महिलाच पार पाडतात.

करिअरमधील अशा ब्रेकमुळे महिलांच्या सेवानिवृत्तीच्या तयारीला गंभीर धक्का पोहोचू शकतो, विशेषतः जर हा करिअर ब्रेक तुम्ही लवकर म्हणजे वयाच्या ३५ ते ४५ वर्षांदरम्यान घेतला असेल. हीच वेळ असते जेव्हा अनेक काम करणाऱ्या महिला आपल्या कौटुंबिक आयुष्याची सुरुवात करतात आणि याचवेळी सर्वाधिक वार्षिक वेतनाचा टप्पाही गाठलेला असतो.
परंतु, अशा महिला जेव्हा पुन्हा कामावर रुजू होतात, त्यांना कित्येक वर्षांचे वेतनातील फायदे किंवा बढती सोडून द्यावी लागते. जरी स्त्री आणि पुरुषांच्या वेतनातील विषमता कमी होत असली, यासंदर्भात अजूनही लांबचा पल्ला गाठावयाचा आहे.
जर करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही युनिट लिंक्ड विमा योजनांसारख्या (युलिप्स) शेअर बाजाराशी निगडीत उत्पादनांमध्ये अधिक पैशांची गुंतवणूक केली, तर तुम्ही काही काळासाठी काम थांबवलेले असेल तरीही तुमच्या बचतींमध्ये मात्र वाढ होत राहील. तुमच्या आयुष्याचे ध्येय साध्य करण्यासाठी कमी वयात नियोजन करणे आणि विवेकी पद्धतीने गुंतवणूक करणे ही तुमच्या संपत्तीचे रक्षण करण्याची गुरुकिल्ली आहे. विशेषतः महिलांसाठी ही बाब अधिक लागू होते.
आरोग्य आणि आयुर्मान
जैविकदृष्ट्या विचार करता महिला आणि पुरुष हे मूलभूतपणे वेगवेगळे आहेत, ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. याचाच अर्थ असा की, त्यांना लागणाऱ्या आरोग्यसेवा आणि वैद्यकीय गरजांमध्येही फरक आहे.
विविध अभ्यासाअंती असे समोर आले आहे की, काही प्रकारच्या कर्करोगांबाबत महिलांचे आरोग्य अधिक संवेदनशील आहे आणि संधिवात किंवा ऑस्टिओपोरॉसिससारख्या तीव्र समस्या उद्भवण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक आहे.
याचवेळी, पुरुषांच्या तुलनेत महिलांचे आयुर्मान अधिक असते. वर्ष २०११ मधील जनगणनेनुसार, ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या महिलांची संख्या होती ४.०५ कोटी. याच वयोगटातील पुरुषांचे प्रमाण होते केवळ ३.६ कोटी. याशिवाय, भारतात महिलांचे सरासरी आयुर्मान ६९.८ वर्षे असून पुरुषांसाठी हे वय ६७.३ वर्षे आहे.
परिणामी, पुरुषांच्या तुलनेत महिलांचा आरोग्याचा खर्च बऱ्यापैकी अधिक असण्याची शक्यता आहे. एका ताज्या अहवालात समोर आलेल्या अंदाजानुसार, ८७ वर्षांपर्यंत जगणाऱ्या ६५ वर्षीय महिलेचा आजीवन आरोग्य सेवा खर्च पुरुषांच्या तुलनेत सरासरी, सुमारे १८ टक्के अधिक असेल. म्हणूनच, जेवढे तुमचे वय कमी, आरोग्य खर्चातील फरक मोठा होत जातो.
तुमच्या सेवानिवृत्तीचे नियोजन करताना हे घटक लक्षात घेणे गरजेचे आहे. तुमचे अतिरिक्त आरोग्य खर्च तसेच दैनंदिन खर्च आरामात भागेल, याची खात्री करणे गरजेचे आहे. तुमच्या एकूणच राहणीमानाच्या गुणवत्तेत तडजोड होता कामा नये. सेवानिवृत्ती बचतीच्या उद्दिष्टाचा अंदाज घेण्यासाठी आणि जास्तीत जास्त संरक्षण आणि फायदा सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ऑनलाइन कॅलक्युलेटर्सचा वापर करु शकता.
कौटुंबिक ध्येये
नियती असो की सामाजिक रचना, बहुतेक वेळा महिला स्वतःची काळजी घेण्याऐवजी कायम इतरांच्या गरजांना प्राधान्य देतात.
जर तुम्ही नोकरी करत आहात किंवा गृहीणी आहात - अविवाहीत किंवा विवाहीत आहात- तुम्हीदेखील कुटुंबाची काळजी घेण्याची बिनपगारी भूमिका निभावण्याची कसरत करत असण्याची आणि तुमच्या आयुष्याचे ध्येय साध्य करण्याच्या प्रवासात इतर आर्थिक त्याग करण्याची शक्यता अधिक आहे.
मला असे वाटते की, आयुष्याचे ध्येय तुम्ही कोण आहात हे पाहत नाहीत. महिलांनादेखील समान लाभ मिळायला हवेत जेणेकरुन त्यांच्या आयुष्याचे ध्येय साध्य करण्यासाठी त्या अधिक सक्षम होतील.
जगभ्रमंती असो वा निवृत्त होताना श्रीमंत आणि सुदृढ होणे असो किंवा तुमच्या पाल्याला शिक्षणासाठी परदेशात पाठवणे असो, आयुष्यातील यासारखी दीर्घकालीन ध्येयांची पुर्तता करण्यासाठी, तुम्ही शक्य तेवढ्या लवकर गुंतवणूक करण्यास सुरुवात करायला हवी.
थोडक्यात सांगायचे, आर्थिकदृष्ट्या सक्रिय राहून, तुमची सेवानिवृत्ती अधिक सहज आणि फलदायी ठरु शकते.
(हा लेख बजाज आलियान्झचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण चुघ यांनी लिहीला आहे.)
(टीप - वरील लेखात व्यक्त करण्यात आलेली मते किंवा गुंतवणूकीच्या टिप्सची जबाबदारी केवळ लेखकाची आहे. ईटीव्ही भारत किंवा त्यांची व्यवस्थापकीय टीम याचे समर्थन करीत नाही. ईटीव्ही भारत टीमची वाचकांना विनंती आहे की गुंतवणूकीचा कोणताही निर्णय घेण्यापुर्वी त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)