नवी दिल्ली- भारत आज आपला 73 वा स्वातंत्र्यदिनी साजरा करत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी यानिमित्ताने देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. त्यांनी माजी आयएएस अधिकारी शाह फैसल यांना दिल्या गेलेल्या वागणुकीबद्दल मोदी सरकारवर टीका केली आहे.
भारत आणि काश्मीरच्या सुपुत्राला स्वांतत्र्य का नाकारले जात आहे? काही वर्षांपूर्वी जेव्हा शाह फैसल यांनी आयएएस परीक्षा पास केली होती, तेव्हा त्यांना हिरो ठरवण्यात आले होते. मात्र, आता तेच लोकांच्या सुरक्षेस धोका ठरले आहेत का? असा सवाल चिदंबरम यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.
शाह फैसल बुधवारी दिल्ली विमानतळावरुन इस्तांबुलकडे निघाले होते. यावेळी त्यांना विमानतळावर अडवून काश्मीरला पाठवण्यात आले. त्यांनतर त्यांना श्रीनगरमध्ये लोक सुरक्षा कायद्याअंतर्गत (PSA) ताब्यात घेण्यात आले होते. शाह फैसल जम्मू काश्मीर पीपल्स मुव्हमेंटचे या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. तसेच ते माजी आयएएस अधिकारी आहेत.
मोदी सरकारने जम्मू काश्मीरमध्ये राबवलेल्या धोरणावर चिंदबरम यांनी टीका केली. जम्मू काश्मीरच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांना नजरकैदेत का ठेवण्यात आले आहे. त्यांचे स्वातंत्र्याचे हक्क का नाकारण्यात येत आहेत, असा सवाल त्यांनी केला आहे. जम्मू काश्मीरच्या सर्व नेत्यांना नजरकैदत ठेवून सकरार काय संदेश देऊ इच्छीते, असेही ते म्हणाले आहेत.