हैदराबाद - संयुक्त राष्ट्रसंघात मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी चीनने आडकाठी घातली आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा भारताचा हा चौथा प्रयत्न होता.
पठाणकोट आणि पुलवामा येथील हल्ल्यानंतर भारत-पाकमधील तणाव वाढल्यानंतर मसूद अजहर हा कळीचा मुद्दा झाला आहे. भारताना राजकीय, आर्थिक आणि रणनीती करत पाकिस्तानची दहशतवादाच्या मुद्द्यावर कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मसूद अजहरला दहशतवादी ठरविण्याबाबत चीनने विशेषाधिकार वापरून मसूदला दहशतवादी ठरविण्याचा प्रयत्नाला खोडा घातला.
यामुळे पाकिस्तानच्या मसूद अजहरला चीन वाचवित आहे-
१) चीन हा पाकिस्तानचा कायमस्वरुपी मित्र राहिला आहे. भारताला शत्रू राष्ट्र मानणाऱ्या पाकिस्तानला सहकार्य करून चीन भारताविरोध रणनीती आखत आहे.
२ ) भारताचे लक्ष पाकिस्तानवर केंद्रीत झाल्यास चीनला भारताचे सामर्थ्य कमी करता येणे शक्य होते. दुसरीकडे चीन त्यांचे सामर्थ्य आणि उर्जा भारतीय उपखंडात वर्चस्व वाढविण्यासाठी सहज करू शकतो.
३) गेल्या काही वर्षांपासून चीनला पाकिस्तानमधील अर्थव्यवस्थेबाबत प्रचंड स्वारस्य निर्माण झाले आहे. चीनच्या वन बेल्ट वन रोडमधील (ओबीओआर) पाकिस्तान हा महत्त्वाचा भागीदार आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवून चीन पाकिस्तानची नाराजी ओढवू इच्छित नाही.
४) चौथे कारण म्हणजे चीन ज्या फोरम अथवा संघटनामध्ये नाही, त्याठिकाणी पाकिस्तान चीनचे हितसंरक्षण करत आलेला आहे. चीनही भारताविरोधात शत्रुत्वाच्या कारवाया करणाऱ्या पाकिस्तानचे हित आजवर पाहत आलेला आहे.
भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानकडे मसूद अजहरची मागणी केली आहे. त्यानंतरच शांतता बोलणी सुरू होईल, असे स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. अजहरला पाकिस्तान भारताकडे सोपविणार नाही. मात्र आंतरराष्ट्रीय दबावाला झुकून कारवाईसाठी पावले उचलेल. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित न केल्याने पाकिस्तानला दिलासा मिळाला आहे. कारण जगभरात दहशतवाद्यांचे नंदनवन म्हणून यापूर्वीच पाकिस्तानची नाचक्की झाली आहे.