नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोनाच्या संकटातून देश सावरत असताना सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पात काय काय तरतुदी असणार याकडे देशवासीयांचे लक्ष लागले आहे. कोरोनाच्या संकटानंतर अर्थव्यवस्थेला मजबुती देतानाच सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अर्थमंत्री काय घोषणा करणार याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.
आरोग्यासाठी भरीव तरतूदींचा अंदाज
वर्षभर सुरू असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद केली जाऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. याशिवाय शिक्षण, कृषी, उत्पादन, बांधकाम, बँकिंग क्षेत्रासाठीही दिलासादायक घोषणा होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आत्मनिर्भर भारतचा असेल प्रभाव?
कोरोना संकटादरम्यान सरकारने अर्थव्यवस्थेला बूस्टर देण्यासाठी आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा केली होती. त्यामुळे याचाही प्रभाव अर्थसंकल्पात दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला होता. यातील सुधारणांचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात बघायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पेपरलेस पद्धतीने अर्थसंकल्प सादर होणार
यंदा प्रथमच अर्थसंकल्प पेपरलेस पद्धतीने सादर होणार आहे. तसेच, 'युनियन बजेट मोबाईल अॅप'ही लॉंच करण्यात आले आहे. सर्व खासदारांना आणि जनतेलाही अर्थसंकल्पातील सर्व बाबी सहजरित्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपमध्ये अर्थसंकल्पातील सर्व गोष्टी उपलब्ध असतील. यामध्ये अॅनुअल फायनान्शिअल स्टेटमेंट (अर्थसंकल्प), डिमांड फॉर ग्रँट्स (डीजी) आणि फायनान्स बिल उपलब्ध असेल.