कोलकाता - पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस घसरत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनेचे पालन करून राज्य चालवावे, असे राज्यपाल जगदीप धनकर यांनी म्हटले आहे.
प्रत्येकाला सर्वत्र जाण्याचा अधिकार
राज्यपाल धनकर म्हणाले, की काल झालेला प्रकार अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी आहे. हा सर्व प्रकार लोकशाहीला लागलेला कलंक आहे. जे. पी. नड्डा यांच्या डायमंड हार्बर भेटीबद्दल काल ममता बॅनर्जी यांनी केलेल्या वक्तव्याविषयी माफी मागायला हवी. त्यांनी आगीशी खेळू नये. प्रत्येकाला सर्वत्र जाण्याचा अधिकार आहे. एक जबाबदार मुख्यमंत्री अशाप्रकारची वक्तव्ये कशी करू शकतात? मुख्यमंत्र्यांनी त्यांचे वक्तव्य मागे घ्यावे. असे केल्यास त्यांना अधिक आदर मिळेल. ते पुढे म्हणाले, लोकशाही मुल्यांना पायदळी तुडवणाऱ्या गोष्टी अत्यंत खेदजनक आहेत. यासंबंधी केंद्र सरकारला अहवाल पाठवला आहे.
काय घडले होते?
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर काल हल्ला झाला. डायमंड हार्बर येथे नड्डा भेट देण्यास आले होते. तर मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी नड्डा यांच्यावर टीका केली होती. या प्रकरणाची केंद्र सरकारने दखल घेतली असून गृहमंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महानिदेशक यांना समन्स बजावले आहे.
मुख्य सचिव आणि पोलीस महानिदेशकांना समन्स
गृहमंत्रालयाने राज्यपाल धनकर यांना काल नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत अहवाल मागितला होता. राज्यपालांनी हा अहवाल आज गृह मंत्रालयास पाठविला. त्यानंतर गृह मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केला.