कोलकाता - पश्चिम बंगाल सरकारने मंगळवारी तेलुगू भाषा राज्याची अधिकृत भाषा घोषित केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी म्हणाले की राज्यात स्थायिक असलेल्या तेलुगू भाषिक नागरिकांनी अनेक वर्षांपासून ही मागणी केली होती. खरगपूर सदरचे आमदार प्रदीप सरकार यांच्या नेतृत्वात प्रतिनिधींच्या पथकानेही सरकारला भेट दिली. त्यानंतर सरकारने तेलुगू भाषेला अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. खरगपूरमधील तेलुगु भाषिकांची मोठी संख्या लक्षात घेता हा निर्णय घेतला गेला आहे.
यापूर्वी बंगाली व इंग्रजी व्यतिरिक्त नेपाळी, उर्दू, संथाली, हिंदी, ओडिया, पंजाबी, राजबंगशी, कामतापुरी, कुर्माली आणि कुरुख यांना राज्याची अधिकृत भाषा म्हणून घोषित केले गेले आहे. तसेच, तेलुगू समुदायाला भाषा-अल्पसंख्याक दर्जा घोषित करण्याचा प्रस्ताव देखील मान्य करण्यात आला आहे.