"आपण युद्धसदृश परिस्थितीत सापडलो आहोत. युद्ध एका अदृश्य शत्रुबरोबर. खऱ्या शत्रुशी लढण्यासाठी शस्त्रे पुरेशी आहेत. परंतु हा विषाणू डोळ्यांना दिसत नाही. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था -डीआरडीओ या शत्रुशी लढा देण्यासाठी स्वतःकडे तंत्रज्ञानाचे शस्त्र गोळा करीत आहे." हे शब्द आहेत जी सतीश रेड्डी यांचे. रेड्डी हे डीआरडीओचे अध्यक्ष आणि संरक्षण मंत्रालयात सल्लागार आहेत. ईनाडूला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी कोविड-19 महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी डीआरडीओकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती दिली.
- या विषाणूला थोपवण्यात डीआरडीओची काय भूमिका आहे?
हा विषाणू एक अदृश्य शत्रू आहे. याला थोपवण्यात आम्ही महत्त्वाची भूमिका बजावत आहोत. अनेक उत्पादने वापरासाठी लगेच उपलब्ध होण्याच्या प्रक्रियेत आहेत. त्यापैकी काही उत्पादन टप्प्यात आहेत.
- मास्क, सॅनिटायझर्स आणि व्हेंटिलेटर्स केव्हा उपलब्ध होतील?
मास्क आणि सॅनिटायझर्सचे उत्पादन पुर्ण क्षमतेने सुरु आहे. पहिल्या टप्प्यात आम्ही ते तेलंगण सरकारला देणार आहोत. व्हेंटिलेटर्सचे नमुने सरकारकडून मंजुर करण्यात आले आहेत. उत्पादनाची जबाबदारी आम्ही खासगी कंपन्यांना दिली आहे.
- डीआरडीओला पौष्टीक आहारनिर्मितीचा अनुभव आहे. कोविड-19 पीडीतांसाठी काय व्यवस्था केली जात आहे?
भविष्यात अन्नाचा तुटवडा निर्माण झाला तर आम्ही तयार अन्नाचा (रेडीमेड फूड) साठा आणि जतन करीत आहोत. जागतिक आरोग्य संघटनेने काही देशांना संभाव्य अन्न तुटवड्याचा इशारा दिला आहे. या देशांमध्ये भारताचा समावेश नाही.
- किती व्हेंटिलेटर्सचे उत्पादन केले जात आहे? तुमच्या त्याची निर्यात करण्यासाठी काही योजना आहे का?
आरोग्य तज्ज्ञांकडून विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकांचा आकडा आणि व्हेंटिलेटर्सच्या आवश्यकतेचा अंदाज लावण्यात येईल. आम्ही त्या अंदाजाप्रमाणे उत्पादन करीत आहोत. व्हेंटिलेटर्सचा तुटवडा असलेल्या देशांना काही योगदान देण्याची इच्छा असल्यास, केंद्राच्या वतीने त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.
- दररोज किती व्हेंटिलेटर्सची निर्मिती केली जाते? एकूण खर्च किती ?
दर आठवड्याला सुमारे 30,000. या आठवड्यात एक बॅच येईल. येत्या काही आठवड्यांमध्ये त्याचे उत्पादन वाढविण्यात येईल. प्रत्येक व्हेंटिलेटरची किंमत सुमारे 4,00,000 रुपये आहे.
- कोविड-19 साठी लस किंवा उपचार शोधण्यासाठी डीआरडीओने कोणाशी भागीदारी केली आहे का?
अडचणीच्या काळात सैन्य दलांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आम्ही वैद्यकीय शास्त्रज्ञांच्या निकट सहकार्याने काम करीत आहोत.
- सैन्य दल आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करीत आहात?
सशस्त्र कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना आम्ही मास्क आणि सॅनिटायझर्सचा संपुर्ण पुरवठा केला आहे. सैन्यातील डॉक्टरांना आम्ही आधीच सतर्क केले आहे.
- डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संरक्षणात्मक साहित्य (प्रोटेक्टिव्ह गिअर्स) केव्हा उपलब्ध होईल?
आम्ही दोन अत्यंत कार्यक्षम गिअर मॉडेल्स तयार केले आहेत. तज्ज्ञांच्या पॅनलनेदेखील त्यास त्वरित मान्यता दिली आहे. प्रत्येक गिअरची किंमत सुमारे 8,000 रुपये आहे. एका आठवड्यात सुमारे 1,50,000 संरक्षणात्मक साहित्याचे उत्पादन करण्यात येईल.
कोविड-19 रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि अर्धवैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी बायो-सूटची निर्मिती केली आहे. संस्थेच्या विविध प्रयोगशाळांमधील संशोधक या प्रक्रियेत सहभागी होते असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या सूटला वैयक्तिक सुरक्षा उपकरण(पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट- पीपीई) असे म्हटले जाते. यासंदर्भातील मागणी लक्षात घेता, दररोज 15,000 पीपीईंचे उत्पादन करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
पीपीईचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने भारत सरकार त्याची आयात करण्याचा विचार करीत आहे. डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळांमधील शास्त्रज्ञांनी टेक्सटाईल, कोटिंग आणि नॅनो तंत्रज्ञानातील कौशल्य वापरुन हा बायो सूट विकसित केला आहे. या बायो सूटची मोठ्या प्रमाणावर चाचणी करण्यात आली आहे, असे संरक्षण मंत्रालयाने एका जाहीरातीत सांगितले होते. खरंतर, सीम सिलींग टेप्सच्या तुटवड्यामुळे बायो सूट उत्पादनात अडथळा निर्माण झाला आहे. पाणबुडीसाठी वापरल्या जाणार्या साहित्यावर आधारित विशेष सीलंट तयार करुन डीआरडीओने या तुटवड्यावर मात केली आहे. याशिवाय, देशभरातील विविध संरक्षण संस्थांना 1.5 लाख लीटर सॅनिटायझरचा पुरवठा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, एन99 मास्कचे उत्पादन करण्यासाठी युद्धपातळीवर व्यवस्था करण्यात येत आहे. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी अगोदरच 10,000 मास्कचा पुरवठा केला असून लवकरच दिवसाला 20,000 मास्कची निर्मिती करण्यात येणार आहे.
हेही वाचा : कोरोनावर लस बनवणे इतके का अवघड..?