पणजी - मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांना पाच वर्षे सरकार सोबत राहणार असा शब्द दिला होता. त्यामुळे आम्ही प्रमोद सावंत यांना पाठिंबा दिला. मात्र सावंत यांनी पर्रीकर यांचा वारसाच समाप्त करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आम्ही जरी सरकारमध्ये नसलो तरीही गोमंतकियांसाठी विधानसभेत ' वॉचडॉग' बनून काम करणार, असे गोवा फॉरवर्ड अध्यक्ष तथा माजी नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.
काँग्रेसमधून फुटन गोवा भाजप सरकारमध्ये आलेल्या आमदारांना मंत्रीपद देण्यासाठी सरकारने 2017 पासून राज्यसरकारच्या आघाडीतील घटकपक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डच्या तीन आणि एक अपक्ष यांना मंत्रीमंडळातून वगळले आहे.
राज्य सरकार बनविण्यासाठी गोवा फॉरवर्ड पक्षाने पर्रीकर यांना पाठिंबा दिला होता. ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सामील झाले होते. त्यामुळे मिरामार येथे ज्या ठिकाणी पर्रीकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तेथेच गोवा फॉरवर्डने पत्रकार परिषद आयोजित करत आपली पुढील वाटचाल स्पष्ट केली आहे.
यावेळी साळगावचे माजी गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर, माजी जलस्त्रोत मंत्री विनोद तथा शिवोली आमदार पालयेकर आणि अपक्ष आमदार तथा माजी महसूलमंत्री रोहन खंवटे यांच्यासह पक्ष कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना सरदेसाई म्हणाले, आमचे मंत्रीपद गेल्याचे दु: ख नाही. आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री पर्रीकर यांना दिलेला शब्द पाळला याचा आनंद आहे. पर्रीकर म्हणाले होते, मी असो वा नसो पाच वर्षे सरकार सोबत रहा. म्हणून आम्ही सावंत यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दिला. मात्र गोवा सरकारचा आजचा कारभार पाहून मनोहर पर्रीकर यांचा 17 मार्च रोजी शारीरिक तर आज राजकीय मृत्यू झाला आहे. गोवा भाजप हे पर्रीकर यांचे नाव, विचार आणि राजकीय वारसा संपवू पाहत आहेत.
आम्ही चौकीदार बनून गोंयकारपण राखणार आहोत, ज्यांना गोंयकारपण शब्द उच्चारता येत नाही ते काय गोंयकारपण राखणार? 15 ख्रिश्चन आमदार पक्षात आले म्हणजे झाले गोंयकारपण झाले असे म्हणावे का? असा सवाल सरदेसाई यांनी उपस्थित केला. आम्ही विरोधी पक्ष म्हणून सभागृहात मानाने बसणार आहोत. आता अधिवेशन जवळ आले आहे. परंतु, तो 'फ्लॉप' शो ठरणार आहे. कारण प्रश्न विचारणारेच सरकारी तिजोरीत जाऊन बसले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. याचबरोबर पालयेकर, साळगावकर आणि खंवटे यांनी ही मुख्यमंत्र्यांच्या अशा वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.