हैदराबाद - भारतात आम्हाला भीक नको आहे. आम्हाला आमची हक्काची जागा मिळण्याची आशा आहे. आम्ही कोणाच्याही भिकेवर जगू इच्छित नाही, असे एआयएमआएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे. हैदराबादमध्ये एका सभेत ते बोलत होते.
१५ ऑगस्ट १९४७ ला आमच्या पूर्वजांनी भारतात थांबण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांनी हा विचार केला होता की एक नवीन भारत निर्माण होईल. जो भारत गांधी, नेहरू, आझाद आणि आंबेडकर यांच्या अनुयायांचा असेल. मात्र, तसे झाले नाही. आम्हाला अजूनही या देशात आमची हक्कची जागा मिळण्याची आशा आहे. आम्ही कोणाच्या भिकेवर जगू इच्छित नाही, असे ओवैसी यावेळी म्हणाले.
उत्तरप्रदेशातील अलिगढ येथे झालेल्या लहान मुलीवरील अत्याचाराचाही त्यांनी निषेध केला. दोषींना शिक्षा मिळण्याची त्यांनी विनंती केली. मात्र, सोबतच दोषींचा कोणत्याही धर्माशी संबंध जोडू नये, असे ते म्हणाले. तसेच देशातील इतर ठिकाणी दलित आणि इतर दुर्बल घटकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांनाही माध्यमानी उजेडात आणावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भाजपच्या विजयात ओवैसींचे योगदान आहे असा आरोप केला जातो. त्यावरून त्यांनी काँग्रसवरही टीका केली. ते म्हणाले आम्ही ज्या राज्यात निवडणुका लढलो त्या राज्यात काँग्रेसला नुकसान झाले, असे म्हणत असाल तर राजस्थान, हरियाणा या राज्यांत काँग्रेसच्या पराभवाची कारणे काय? असा सवाल त्यांनी केला. मुस्लिमांना अभय देणार असल्याच्या राहुल गांधींच्या वक्तव्याचाही त्यांनी निषेध केला. आम्हाला कोणाच्या भिकेवर जगण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. उलट राहुल गांधींना हिंदुबहुल अमेठीतून पराभव स्विकारावा लागाला आसून ४० टक्के मुस्लीम मतदार असलेल्या वायनाडमधून ते विक्रमी मतांनी विजयी झाले आहे. त्यामुळे राहुल गांधीच मुस्लिमांच्या आधारावर असल्याचे ते म्हणाले.