गुवाहटी- पूर्व उत्तर भारतात पावसाने कहर केला आहे. ब्रम्हपुत्रा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने आसाम राज्यातील जिल्ह्यांना त्याचे नुकसान झाले आहे. यातच मोरीगाव जिल्ह्यातील शाळेची इमारत कोसळण्याची चित्त थरारक घटना समोर आली आहे. ब्रम्हपुत्रा नदीचे पाणी शाळेच्या इमारती खालून वाहू लागल्याने क्षणार्धात इमारत कोसळली आणि पाण्यात वाहून गेली.
१२ तारखेला मोरीगाव जिल्ह्यातील तेंगागुरी भागात ब्रम्हपुत्रा नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरेले होते. या पुराचे पाणी तेंगागुरी भागातील प्राथमिक शाळेच्या इमारती खालूनही वाहू लागले. पाण्याचे प्रवाह वेगाने असल्यामुळे शाळेच्या इमारतीचा भाग खचला आणि ती इमारत कोसळली. दरम्यान या दुर्घटनेमध्ये पूर्व खबरदारी घेतल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.
१४ लाख लोकांना पुराचा फटका
ब्रम्हपुत्रा नदीला आलेल्या पुरामुळे आसाम राज्याची परिस्थिती ढासळत चालली असून राज्याला आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. पुरामुळे शनिवारी अजून एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मरणाऱ्यांची संख्या आता ७ वर पोहोचली आहे. राज्याच्या २५ जिल्ह्यातील जवळपास १४ लाख लोकांना या पुराचा फटका बसला आहे.
सध्या गुव्हाटी, जोरहाट येथील निमातीघाट, सोनितपूर येथील तेजपूर, धुबरी टाउन येथील गोलपारा, कॅचर येथील ए. पी घाटातील बरक, आणी करिमगंज येथील बदरपूर घाट या भागातून ब्रम्हपुत्रा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे.