गाझियाबाद - उत्तर प्रदेशातील गाझीयाबादमध्ये निर्माणाधीन भिंत कोसळून २५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गाझियाबादमधील मुरादनगर भागात एका स्मशानभूमीची भिंत बांधण्याचे काम सुरू होते. मात्र, अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरिकांच्या अंगावर भिंत कोसळून अपघात झाला.
भिंतीखाली अडकलेल्या ३८ पेक्षा जास्त व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे. भिंतीखाली सापडल्याने अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहचले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पाऊस पडत असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.
योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले दुःख..
या दुर्घटनेबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केले आहे. 'जिल्हा अधिकार्यांना मदतकार्य करण्याच्या व दुर्घटनेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. घटनेतील पीडित व्यक्तींना शक्य तेवढी मदत केली जाईल' असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी घटनेतील मृताच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला शोक..
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. या कठीण प्रसंगी आपण मृतांच्या नातेवाईकांच्या पाठिशी उभे असल्याची भावना दोघांनी व्यक्त केली.