अमरावती (आंध्र प्रदेश) - लोकसभा निवडणूकांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर आंध्र प्रदेशातील एका शासकीय शाळेत ईटीव्ही भारतच्या पत्रकाराला व्हीव्हीपॅट मशिनच्या चिठ्ठ्या आढळल्या आहेत. ही घटना नेलोर जिल्ह्यातील शासकीय शाळेतील असून घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात खळबळ उडालेली आहे.
दिल्ली येथे रविवारी तब्बल ६ विरोधी पक्षांनी ईव्हीएम विरोधात पत्रकार परिषद घेतली होती. तर, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ईव्हीएमच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. तसेच ५० टक्के व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मतांशी जुळवून पाहावे, यासाठी हे पक्ष सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या आढळल्यानंतर ईटीव्ही भारतच्या पत्रकाराने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर घटनास्थळी अधिकारी दाखल झाले होते. त्यांनीही या चिठ्ठ्या तपासून पाहिल्या आहेत. तसेच या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहेत.