लखनौ - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात उत्तरप्रदेशातील कानपूरमध्ये आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. यावेळी आंदोलकांमधीच एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात ८ जण जखमी झाले आहेत. तर राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या हिंसक आंदोलनात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मेरठ, कानपूर, बिजनौर येथे हिंसक आंदोलन सुरू आहे.
हिंसक आंदोलनानंतर पोलिसांनी २५ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. दक्षिण कानपूरमधील बाबुपूरा भागामध्ये आंदोलकांनी ४ वाहनांना आग लावली होती. तसेच पोलिसांवर दगडफेकही केली. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या कांड्यांचा वापर केला. मात्र, आंदोलक काही केल्या हटत नव्हते. यावेळी आंदोलकांमधील एका व्यक्तीने गोळीबार केल्यामुळे ८ जणांना गोळी लागली. सर्व जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - अफगाणिस्तान : हिंदुकुश पर्वत रांगांमध्ये ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप, उत्तर भारतातही जाणवले धक्के
नमाज पढल्यानंतर काही लोक रस्त्यावर येत होते. त्यावेळी पोलिसांनी लोकांना मज्जाव केल्यामुळे आंदोलकामधील एकजणाने गोळीबार केला. यामध्ये ८ जण जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी २५ जणांना अटक केली आहे, तर इतर लोकांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. शहरामध्ये संचारबंदी लागू केल्यानंतरही अनेक जण आंदोलन करत आहेत. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवल्यानंतरही आंदोलक घराबाहेर पडले आहेत.