सुकमा (छत्तीसगड) : सुकमा येथील ग्रामस्थांनी दोरनापाल-जागरगुंडा रस्त्यावरील पोलामपल्लीजवळील पुलाच्या दुरुस्तीच्या कामात प्रशासनास मदत केली. काही दिवसांपूर्वी हा पूल नक्षलवाद्यांनी स्फोटकांच्या सहाय्याने तोडला होता.
'6 आणि 7 एप्रिल दरम्यानच्या रात्री दोरनापाल-जागरगुंडा रस्त्यावरील हा पूल माओवाद्यांनी स्फोटक सामग्रीचा वापर करून तोडला होता. हा पूल दोरनापाल, चिंतलनार, जागरगुंडाच्या भागातील सुमारे 120 हून अधिक गावांसाठी जीवनवाहिनी आहे. त्या गावांना रेशन पुरवठा, वैद्यकीय सुविधा आणि ग्रामस्थांच्या इतर सर्व मूलभूत गरजा केवळ या रस्त्याद्वारेच पूर्ण केल्या जातात' असे आयजी अधिकारी पी. सुंदरराज यांनी सांगितले आहे.
हेही वाचा... 'सोशल डिस्टन्सिंग' पाळत नाहीत म्हणून महिला डॉक्टरांवरच हल्ला; दिल्लीतील घटना..
'नक्षलवाद्यांनी पुलाचे नुकसान केल्यांनंतर जिल्हा प्रशासन, पोलीस अधिकारी आणि निमलष्करी दलांनी या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. कोविड-19 च्या संकटकाळात त्या सर्व गावांना आपत्कालीन सेवा सुरू करणे आवश्यक असल्याने पुलाचे काम सुरु करण्यात आले. त्यावेळी पुलाच्या दुरुस्ती कामात जवळपासच्या भागातील काही ग्रामस्थही सहभागी झाले होते' असे पी. सुंदरराज यांनी सांगितले.