लखनऊ : उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड विकास दुबे सध्या फरार आहे. पोलिसांपासून लपत तो फरीदाबादमधील एका ओयो हॉटेलमध्ये राहत होता. याठिकाणी पोलीस पोहोचणार, त्याच्या तीन तासांपूर्वीच तो हॉटेलमधून फरार झाल्याचे समजले आहे. पोलिसांनी त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे.
विकास दुबेच्या तीन साथीदारांमध्ये त्याचा भाचा प्रभात मिश्रा उर्फ कार्तिकेय याचाही समावेश आहे. त्याच्यासोबत अंकुर आणि श्रवण नावाच्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मिश्राकडून पोलिसांनी दोन पिस्तुलेही जप्त केली आहेत. या तिघांनाही शहरातील विविध ठिकाणांहून अटक करण्यात आली होती. पोलीस सध्या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.
दरम्यान, विकास दुबे ज्या हॉटेलमध्ये लपून होता, ते राष्ट्रीय महामार्ग क्र. १९ वर आहे. हा महामार्ग थेट दिल्ली-आग्रा आणि गुरुग्रामकडे जातो. त्यामुळे दुबे गुरुग्रामकडे पळून गेला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुग्राममध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कानपूरमधील बिक्रू खेड्यात विकास दुबे याच्या टोळीवर छापा टाकताना झालेल्या चकमकीत पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलिसांना जीव गमावावा लागला होता. सध्या उत्तर प्रदेश पोलीस विकास दुबेचा शोध घेत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दुबेला पकडण्यासाठी यंत्रणा सक्रिय केली आहे. विकास दुबेचा राज्यभरात शोध सुरू आहे.
हेही वाचा : यूपी पोलीस हत्याकांड : विकास दुबेचा 'राईट हॅन्ड' अमरला पोलिसांनी घातल्या गोळ्या