नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाचे रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी केंद्र आणि राज्यांच्या पातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अशात नवी आव्हानं उभी राहत आहेत. आग्रा येथील एका भाजी-पाला विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून एकच खळबळ उडाली आहे.
संबधीत भाजी-पाला विक्रेता पूर्वी ऑटो चालवायचा. मात्र, लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे त्यांने ऑटोमधून भाजी-पाला विकण्यास सुरवात केली. काही दिवसांपूर्वी तब्येत बरी नसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. शुक्रवारी त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा संपूर्ण भाग हॉटस्पाट म्हणून घोषीत केला आहे.
देशातली एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 15 हजार 712 झाला आहे, यात 12 हजार 974 अॅक्टिव्ह केसेस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 2 हजार 230 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 507 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.