बँकॉक : वंदे भारत मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या मोहिमेंतर्गत थायलंडमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन आज एक विमान दिल्लीमध्ये येणार आहे.
एअर इंडियाच्या एआय-३३५ या विमानातून बँकॉकमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यात येईल. थायलंडमधील भारतीय दूतावासाचे कर्मचारी या लोकांना सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी, तसेच पाणी आणि अन्न पुरवण्यासाठी उपलब्ध असतीलच, असे भारतीय दूतावासाने ट्विट करत म्हटले आहे.
बँकॉकपासून साधारणपणे १५० किलोमीटर दूर असणाऱ्या फुकेट आणि पटायामधून याआधीच भारतीयांना बसेसच्या माध्यमातून बँकॉकला आणण्यात आले आहे.
वंदे भारतच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही परदेशांमध्ये अडकलेल्या १४,८०० भारतीयांना परत आणण्याचा आमचा उद्देश्य होता. आजपर्यंत ८,५०० भारतीय परतलेही आहेत. बाकी भारतीयांना परत आणण्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही आमचे उद्दिष्ट दुप्पट केले आहे. १४९ विमानांच्या मदतीने ३१ देशांमधील साधारणपणे ३० हजार भारतीयांना मायदेशी आणण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे.
हेही वाचा : 'अम्फान' महाचक्रीवादळ आज किनारपट्टीवर धडकणार, ओडिशात मुसळधार पावसाला सुरुवात