पणजी - गोवा विधानसभेच्या पणजी मतदारसंघासाठी १९ मे रोजी पोटनिवडणुकीत होत असून आम आदमी पक्षातर्फे वाल्मिकी नाईक निवडणूक रिंगणात उतरणार आहेत, अशी माहिती आपचे गोवा संयोजक एल्वीस गोम्स यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सरचिटणीस प्रदीप पाडगावकर, शेखर नाईक, बीएट्रीज पिंटो उपस्थित होते.
अधिक माहिती देताना गोम्स म्हणाले की, टेक्सास विद्यापीठातून अभियंता पदवी घेतलेले वाल्मिकी नाईक हे सुरुवातीपासूनचे पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाची त्यांना पसंती आहे. ते अधिकाधिक युवा मतदारांना पक्षाकडे आकर्षित करतील याचा आम्हाला विश्वास आहे. नाईक यांच्या तोडीचा भाजपकडे उमेदवार नाही.
गोम्स म्हणाले की, पणजी विधानसभेच्या जागेसाठी यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष दिवंगत शांताराम नाईक यांच्या विनंतीवरून आपने उमेदवार दिला नव्हता. त्याची आठवण ठेवत काँग्रेसने आप उमेदवाराला पाठिंबा द्यावा. आप म्हणजे भाजपाची बी टीम म्हणून आरोप केला जातो. त्याविषयी बोलताना गोम्स म्हणाले, केवळ काँग्रेसमुळेच भाजप सत्तेवर आले हे आम्ही कधीही सिद्ध करू शकतो.