लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्याच्या बाराबांकी जिल्ह्यात एका नराधमाने आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत, तिला गर्भवती केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एका गावात ही घटना घडली आहे. आपल्या १६ वर्षांच्या मुलीवर हा व्यक्ती गेल्या वर्षभरापासून अत्याचार करत होता. मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे तिने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. मंगळवारी पोटात दुखत असल्याचे तिने आपल्या आत्याला सांगितले. त्यानंतर आत्याने विचारपूस केली असता मुलीने तिला सगळा प्रकार सांगितला. यानंतर तिच्या आत्याने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत मुलीला रुग्णालयात भरती केले. रुग्णालयात डॉक्टरांनी ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. तेथून तिला जिल्हा महिला रुग्णालयात नेण्यात आले. जिथे बुधवारी तिने एका मृत बाळाला जन्म दिला. पोलिसांनी या अर्भकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीचा बाप हा अपराधी प्रवृत्तीचा असून कित्येक वेळा तुरुंगातही जाऊन आला आहे. दोन वर्षांपूर्वी या मुलीच्या आईचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीला सात मुले असून, आठव्या बाळाच्या डिलिव्हरी दरम्यान त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
हेही वाचा : जयपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; तिघांना अटक